इंदापूर : महान्यूज लाईव्ह
नीरा नदीला पूर आला असून मासेमारी करताना तिघेजण पुरात वाहून गेले अशा प्रकारची खोटी माहिती इंदापूर तालुक्यातील तावशी येथील एकाने 112 क्रमांकावर डायल करून दिली आणि पोलिसांची धावपळ उडाली. मात्र परिस्थिती लक्षात येताच पोलिसांनी याच्यावर कारवाई केली.
याप्रकरणी वालचंदनगर पोलिसांनी तावशीतील 38 वर्षीय व्यक्तीवर गुन्हा दाखल केला. दत्तात्रय गायकवाड याने 2 ऑक्टोबर रोजी 112 क्रमांक डायल करून नीरा नदीला पूर आला असून तावशी हद्दीत मासेमारी करताना तिघेजण वाहून गेले आहेत अशी खोटी माहिती दिली.
या ठिकाणी तातडीने पोलिसांची मदत आणि वैद्यकीय सुविधा पाठवावी अशी ही माहिती या फोनवरून त्याने दिली होती, त्यावरून जिल्ह्यातील यंत्रणेची धावपळ उडाली. वालचंदनगर पोलिसांनी देखील तातडीने तावशीमध्ये पोलीस कर्मचारी पाठवले, परंतु येथे नदीला पूर अथवा पाणी नव्हते, तसेच कोणीही वाहून गेले नव्हते. मग पोलिसांनी शोधाशोध सुरु केल्यानंतर हा फोन गायकवाड याने केला होता असे निदर्शनास आले.
त्यावरून पोलिसांनी त्याची चौकशी केली, तेव्हा त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी त्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर तो दारू पिलेला आढळून आला. दरम्यान या संदर्भात वालचंदनगर पोलिसांनी खोटी माहिती देऊन शासनाची दिशाभूल केल्याचा तसेच शासकीय यंत्रणेचा दुरुपयोग केल्याचा आणि शांतता भंग केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली वालचंद नगर पोलीस करत आहेत.











