वाईत ‘विनामास्क’ जो आढळला; तो कोरोना चाचणीला सामोरा गेला! बाजारपेठेत ऑन द स्पॉट चाचणी!

वाई शहरातील कोरोना थोपविण्यासाठी नगरपरिषदेचा दणका; मार्केटमध्ये विनामास्क आढळल्यास जागेवरच कोरोना चाचणी

दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह

जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या आदेशानुसार वाई शहरातील निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथील करण्यात येत आहेत. यामध्ये अत्यावश्यक बाबींची तसेच इतरही दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत चालू ठेवण्यास परवानगी दिली आहे. याबाबतची नियमावलीही जाहीर करण्यात आली आहे. सदर नियमांचे पालन न करणार्‍यांसाठी पालिकेने टेस्टींग ऑन व्हील्स ही मोहीम सुरू केली आहे. यामुळे नियमांचे पालन न करणार्‍यांची जागेवरच कोरोना टेस्टींग करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ यांनी दिली.

आजपासून सुरू झालेल्या मार्केटमुळे शहरातील गर्दीचे वाढते प्रमाण लक्षात घेता कोरोनाबाधितांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून आजपासून सुरू झालेल्या मार्केटमधील कोरोनाप्रसार टाळण्यासाठी नगरपरिषदेने जागेवर रॅपिड अँटीजेन टेस्टची मोहीम सुरू केली आहे.

नगरपरिषदेचे कर्मचारी, पोलिस व आरोग्य विभाग यांच्या संयुक्त पथकाव्दारे शहरात ही मोहीम राबविण्यात येत आहे. मास्क न घालणारे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणार्‍या व्यक्तींचे तसेच नियम न पाळणार्‍या दुकानदार व कामगार यांचे जागेवरच टेस्टींग करण्यात येत आहे. टेस्ट करून पॉझिटीव्ह आढळलेल्या व्यक्तींना थेट कोविड सेंटर येथे पाठविण्यात येणार आहे. यासाठी वाई नगरपरिषदेची रुग्णवाहीका टिमबरोबर ठेवण्यात आली आहे. या मोहिमेव्दारे शहरातील गर्दी वाढली, तरी सुपर स्प्रेडर्स कडून होणारा कोरोनाचा प्रसार वेळीच रोखण्यात प्रशासनाला मदत होणार आहे.

सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन करणारे व विनामास्क फिरणारे लोक यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यासाठी नगरपरिषदेची दोन स्वतंत्र पथके शहरात नियुक्त करण्यात आली आहेत. शहरातील निर्बंध शिथील करण्यात आले असले तरी या पथकांमार्फत कारवाई सुरूच राहणार आहे. शहरातील मुख्य बाजारपेठा चालू झाल्यामुळे शहराच्या आसपासच्या ग्रामीण भागातून येणार्‍या नागरिकांची संख्या देखील वाढणार आहे. त्यामुळे शहरात कोणीही विनामास्क फिरू नये. एका ठिकाणी 5 पेक्षा जास्त व्यक्ती आढळून आल्यास त्यांची जागेवरच कोविड चाचणी करण्याची कारवाई केली जाणार आहे.

आज मोहीमेच्या पहिल्याच दिवशी शहरात 151 चाचण्यांपैकी बाजारपेठेत 100 जणांच्या रॅपिड टेस्ट करण्यात आल्या असून त्यापैकी 2 भाजीविक्रेते पॉझिटीव्ह आल्याने त्यांना तात्काळ किसनवीर कोविड केअर सेंटरला हलविण्यात आले आहे. यापुढेही ही मोहीम शहराच्या मुख्य रस्त्यांवर तसेच व्यापारी पेठेत सुरूच राहणार आहे.

मार्केट उघडले असले तरीही हलगर्जीपणा नको

वाई शहरात टेस्टींग ऑन व्हील्स ही मोहीम अशच सुरू राहणार असून शहरात कोणत्याही कारणाने येणार्‍या नागरीकांनी तसेच खेडोपाडयातील लोकांनी कोविड प्रोटोकॉलचे पालन करणे बंधनकारक राहील. बँका, दुकाने, भाजीमार्केट, पतसंस्था तसेच सरकारी कार्यालये येथे गर्दी केल्याचे आढळल्यास तिथे उपस्थित सर्वांची रॅट टेस्ट करून पॉझिटीव्ह व्यक्तींना तिथून कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले जाईल. कोविडची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी सर्वांनीच सर्वतोपरी प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यामुळे मार्केट उघडले असले तरी कोरोनाविषयक नियमांचे पालन करण्यात कोणताही हलगर्जीपणार करू नये, असे आवाहन मुख्याधिकारी पोळ यांनी केले आहे.

Maha News Live

Recent Posts

इंदापूरमध्ये घड्याळाचा प्रचार करण्यासाठी आणलेल्या महिलांना पैसे दिले नाहीत? पैशावरून राडा!

इंदापूर : महान्यूज लाईव्ह  महायुतीचा प्रचार करण्यासाठी आणलेल्या महिलांना पैसे दिले नाहीत, म्हणून महिलांनी इंदापूरात…

2 days ago

मोदीसाहेब, तुमचा टेलीप्रॉम्टर तपासा… खरंच सांगा शेतकऱ्यांना दिलासा कोणी दिला?

बारामती : महान्यूज लाईव्ह गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अचानक सभा वाढवल्या. या…

3 days ago