डॉ. संदेश शहा, इंदापूर
जिल्हा प्रशासनाच्या मदतीने इंदापूर तालुक्याचे तहसीलदार जीवन बनसोडे व इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या नेतृत्वात महसूल व पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त पथकाने सहा फेब्रुवारी रोजी उजनी जलाशयात इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी व वनगळी येथे वाळू माफियांच्या ४ बोटी पकडून त्या बोटी बुडवून नष्ट केल्या.
या कारवाईत इंदापूरचे निवासी नायब तहसीलदार अविनाश डोईफोडे, इंदापूर मंडळ अधिकारी श्याम झोडगे, माळवाडी मंडळ अधिकारी औदुंबर शिंदे, काटी मंडल अधिकारी मल्लाप्पा ढाणे, ग्राम महसूल अधिकारी अशोक पोळ, संदीप मैलागिर, प्रताप गायकवाड, राजाभाऊ पिसाळ, अमोल हजगुडे, भास्कर घोळवे, तहसील शिपाई संग्राम बंडगर, पोलीस पाटील सुनील राऊत, प्रदीप भोई, अरुण कांबळे, विजयकुमार करे, आप्पा गायकवाड, पोलीस कर्मचारी लक्ष्मण सूर्यवंशी व नंदू जाधव, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील ड्रोन सर्व्हेअर संकेत बाबर व बबलू नरळे यांनी भाग घेतला.
दरम्यान तहसील व पोलीस खात्याने महिनाभरात तिसरी कारवाई केली आहे. अवैध वाळू उपशावर थेट कारवाई प्रशासन करत असले, तरी फक्त बोटींना जलसमाधी देऊन उपयोग नाही, तर अवैध वाळू उपशावर कायमचा चाप लावण्यासाठी बोटींचे मालक शोधून त्यांच्यावर कडक कारवाई होणे ही काळाची गरज आहे. कारण अवैध वाळू वाहतुकीमुळे होणारे अपघात, रस्त्यांची चाळण, गावागावातील दादागिरी व भांडणे, त्यामुळे खराब होणारे सामाजिक व आर्थिक स्वास्थ्य यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनास तारेवरची कसरत करावी लागते.
त्यातच वाळू माफियांकडून यापूर्वी या व्यवसायातील वर्चस्वातून दोन खून झाले आहेत तर माजी तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर भरदिवसा इंदापूर शहरात त्यांच्या कार्यालय रस्त्यावर हल्ला करण्यात आला आहे. वाळू व्यावसायिकांकडून पुणे सोलापूर महामार्गावर इंदापूर येथील मालोजी राजे चौकात प्रशासनाच्या जाचाविरोधात महामार्ग रस्ता बंद आंदोलन करण्यात आले होते.
त्यामुळे इंदापूर तालुका वाळू उपशासंदर्भात संवेदनशील तालुका म्हणून ओळखला जात आहे. इंदापूर तालुक्यास वरदान ठरलेल्या नीरा नदीची वाळूसाठी चाळण झाली आहे तर उजनीच्या पोटात ५१ हजार कोटी रुपयांचे काळे सोने म्हणजे वाळू असल्याचा सरकारी निरी संस्थेचा निष्कर्ष आहे. त्यामुळे अवैध वाळू उपसा रोखून कोट्यावधी रुपये खर्चून उभा केलेल्या उजनी धरणास धोका पोहोचू नये, येथील जैववैविध्य व्यवस्थित रहावे, मत्स्य व्यवसायास धोका पोहोचू नये, येथील पर्यटनास देखील शेतकऱ्यांचे नुकसान न होता चालना मिळावी यासाठी आदर्श आचारसंहिता तयार करावी अशी मागणी उजनी पाणलोट मधून होत आहे.











