पुढील युग हे कलियुग नसून आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचे युग असणार आहे. यामध्ये अनेक कामे ही मनुष्याच्या बुद्धिमत्तेपेक्षाही अनेक पटीने वेगवान असलेल्या रोबोटच्या माध्यमातून होतील. चीनमध्ये अनेक शोरूममध्ये आताही रोबोट आहेत.मात्र एआयच्या या दुनियेमध्ये एका रोबोटने आत्ताच आपली करामत दाखवली असून, दुसऱ्या एका शोरूममध्ये जाऊन चक्क बारा रोबोट फितवले व त्यांचे अपहरण केल्याची घटना सध्या चर्चेत आहे. याचा एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.
चीनमधील शांघाय येथील ही घटना असल्याचे सांगितले जात असून सोशल मीडियावर जो सीसीटीव्ही फुटेजचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, त्यातील एका छोट्या रोबोटचे नाव आहे एरबाय! हा येरबाय रोबोटिक्स कंपनीच्या एका शोरूम मधून बारा मोठ्या रोबोटचे अपहरण करत स्वतःच्या घरी त्यांना घेऊन जातो, अशा स्वरूपाचा हा सीसीटीव्ही फुटेज चा व्हिडिओ आहे.
चीन म्हटलं की आपल्याकडं विनोदाने घेतले जाते. चले तो चांद तक; नही तो शाम तक अशा स्वरूपाची चीनच्या उत्पादनांची व्याख्या केली जाते, मात्र हंग्जो या कंपनीने बनवलेला एरबाय नावाचा हा रोबोट मानवी शैलीसारखी चातुर्य दाखवून बातचीत करतो. त्याला ए आय पॉवर्ड केलेले आहे. या रोबोटने चक्क त्याच्यापेक्षा मोठ्या रोबोटना समुपदेशन करत तुम्हाला घर नाही ना? मग माझ्या घरी चला अशा स्वरूपाची सूचना केली आणि काही वेळाने सगळे रोबोट त्याच्या पाठोपाठ गेले, अशा स्वरूपाचा हा व्हिडिओ चित्रित करण्यात आला आहे.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स द्वारे प्रमाणित केलेल्या त्याच्या संभाषणाच्या फीचर्स चा वापर करत त्याने चिनी भाषेत या सर्व रोबोट्सना संवाद साधला इतर रोबोट्स त्याला आम्ही 24 तास काम करतो आम्हाला कुठे घर नाही अशा स्वरूपाची चर्चा करत असून तो मात्र मग माझ्यासोबत माझ्या घरी चला अशी त्यांना आमंत्रणाची भाषा वापरतो आणि त्यानंतर सगळे रोबोट त्याच्या पाठोपाठ निघून जातात हे सीसीटीव्ही फुटेज मध्ये चित्रित करण्यात आले आहे.
चीनमधील उत्पादनाविषयी तुमची कोणाच कितीही मत मतांतरे असतील, मात्र भविष्यातील हे चित्र एखाद्या चित्रपटासारखेच आपल्या डोळ्यासमोर झळकले तर त्यात नवल वाटायचे कारण नाही. अनेक हॉलिवूड चित्रपटांमध्ये दाखवले गेले आहे की, संगणक हे माणसांपेक्षा प्रभावी झाले व माणसांची नेतृत्वशैली झुगारून ते मानव जात संपवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे आपल्याला पाहायला मिळतात. मात्र प्रत्यक्षात खरोखरच हे पाहायला मिळू शकते व संगणक हे माणसाच्या बुद्धिमत्तेपेक्षा कित्येक पटीने स्वतःची बुद्धिमत्ता तयार करून माणसांशी संघर्ष करतील अशी भीती बाळगायला हरकत नाही.
हा व्हिडिओ पाहून आता प्रश्न विचारला जात आहे की या भविष्यातल्या घडामोडींशी सामना करायला तुम्ही तयार आहात ना?











