विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
बारामती : गेल्या अनेक दिवसांपासून माळेगाव साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्प विस्तारीकरणाचा मुद्दा गाजत आहे.२४० केएलपीडी प्रकल्प करावा अशी भूमिका सत्ताधारी संचालक मंडळाने घेतली होती तर ५०० केएलपीडीचा इथेनॉल प्रकल्प कसा फायद्याचा आहे याबाबत विरोधकांनी भूमिका मांडली होती.सत्ताधारी व विरोधकांनी कारखाना कार्यक्षेत्रातील प्रत्येक गावांमध्ये जाऊन कोणता प्रकल्प फायद्याचा आहे.याबाबत सभासदांमध्ये जनजागृती केली होती.

माळेगाव साखर कारखान्याच्या झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये संपूर्ण सभासदांचे लक्ष लागलेला इथेनॉल प्रकल्प विस्तारीकरणाचा प्रस्ताव रद्द केल्याची घोषणा कारखान्याचे अध्यक्ष अॅड. केशवराव जगताप कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केली.प्रकल्प विस्तारीकरणाचा नव्याने अहवाल तयार करून तो विशेष सर्वसाधारण सभेत मांडून सभासद जो निर्णय देतील तो मान्य करण्याचे ठरले आहे.असे अॅड. केशवराव जगताप यांनी सांगितले.
पुढे बोलताना जगताप म्हणाले, अंतिम ऊस बिलातील उर्वरित एक रकमी प्रतिटन ४३६ रुपये देणार असल्याचे सांगितले.तसेच गाळप हंगाम पूर्ण क्षमतेने चालवून साखरेसह सर्वच उपपदार्थांचे विक्रमी उत्पादन घेतल्याने ऊस उत्पादक सभासदांना जास्तीचा ऊसदर दिला. यापुढेदेखील पूर्ण क्षमतेने गाळप करून विक्रमी ऊसदर देण्याचा मानस आहे.यावेळी जास्तीत जास्त उत्पादन घेणाऱ्या सभासदांचा,विविध क्षेत्रात यश मिळवणाऱ्यांचा सन्मानही यावेळी करण्यात आला. यावेळी सभासदांनी मागील वर्षाचे ड्राफ्ट प्रोसिडिंग, अहवालातील नफा तोटा, खर्च, विविध समस्या याबाबत आपली भूमिका मांडली.
एका सभासदाने भाषणात माकड असा उल्लेख केला आणि सभासदांची झाली हाणामारी!
माळेगाव सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू झाल्यानंतर स्टेजवरून बोलत असताना एका सभासदाने माकड असा उल्लेख केला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला आणि वार्षिक सर्व साधारण सभेत स्टेजसमोर बसलेल्या सभासदांमध्ये हाणामारी झाली. यावेळी पोलिसांनी सौम्य लाठीमारही केला. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर वातावरण निवळले. परंतु झालेल्या या प्रकारची संपूर्ण पुणे जिल्ह्यात चर्चा झाली.











