महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
मुंबईत वडाळा येथील अवैध प्रार्थनास्थळांचा ताबा घेण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने बृहन्मुंबई महापालिकेला दिले आहेत. अर्थात मंदिरावरील पाडकामावर मात्र न्यायालयाने तुर्तास स्थगिती दिली आहे.
वडाळ्यामधील गणेश मंदिर मार्गावरील साईधाम मित्र मंडळ मंदिरावर कारवाई करण्याचे निर्देश न्यायालयाने मे महिन्यात दिले होते.
लॉकडाऊन हटविल्यानंतर यावर कारवाई करण्याची हमी महापालिकेकडून देण्यात आली. न्यायालयाने ही हमी मान्य करून कोणत्याही धार्मिक कार्यक्रमासाठी मंदिराचा वापर करण्यास मनाई होती.
मात्र असे असतानाही गणेशोत्सवामध्ये मंदिराचा वापर करण्यात आला. त्यामुळे न्यायालयाने दिलेल्या आदेशांचा अवमान झाला आहे. असे सांगणारी याचिका सामाजिक कार्यकर्ते फ्लेचर पटेल यांनी केली आहे.
महापालिकेने यामध्ये दखल दिली नाही अशी तक्रारही त्यांनी केली. याची नोंद घेत न्यायालयाने संबंधित स्थानिक रहीवाशांकडून खुलासा करण्याचे निर्देश दिले आहेत.
त्यांची बाजू ऐकून घेईपर्यंत पाडकामावर स्थगितीचा आदेश न्यायालयाने दिला आहे. महापालिकेकडून याचिकेतील मुद्द्यांवर कबुली देण्यात आली. तसेच दिलगीरी व्यक्त करून कारवाईची हमी देण्यात आली होती.











