राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
दौंड : बारामती लोकसभा मतदारसंघात सकाळी सात पासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली, पण उन्हाची तीव्रता वाढल्याचा मोठा फटका मतदानावर होत असल्याचे चित्र आहे. दौंड तालुक्यात दुपारी तीन वाजेपर्यंत फक्त ३७ टक्के मतदान झाले.
दौंड विधानसभा मतदारसंघातील अनेक मतदान केंद्रावर मतदारांची अकरा वाजेपर्यंत गर्दी पाहायला मिळाली तर काही मतदान केंद्रावर तुरळक गर्दी पाहायला मिळाली. तर काही मतदान केंद्रावर शुकशुकाट असल्याचे चित्र दिसून आले. दुपारी एक वाजेपर्यंत दौंड विधानसभा मतदारसंघात २० टक्के मतदान झाले होते. तर दुपारी तीन वाजेपर्यंत ३७ टक्के मतदान झाले. .
दोन तासात फक्त १७ टक्के मतांची वाढ झाली. एकूणच मतदारांमध्ये निरुत्साह पहायला मिळाला. तालुक्यातील मोठ्या मतदार संख्यांच्या गावांमध्येही कमी मतदान झाले. अनेक मतदान केंद्रावर गर्दी नसल्याचे चित्र होते. अनेक मतदान केंद्रावर महिला, वृध्द व अपंग मतदारांना मतदान केंद्रावर येण्यासाठी वाहनांची सोय नसल्याने गैरसोय झाल्याचे चित्र होते. त्यामुळे तालुक्यात मतदानाची टक्केवारी कमी होण्याची शक्यता आहे.
एकंदरीत बारामती लोकसभा मतदारसंघात उभे असलेल्या उमेदवारांसाठी चिंतेचा विषय ठरला. कमी होणारी मतांची टक्केवारी कोणाला तारणार आणि कोणाला फटका बसणार हे पहावे लागणार आहे.











