ऋषिकेश यादव, भिगवण
विद्या प्रतिष्ठानचे अनंतराव पवार इंग्लिश मिडीयम स्कूल, चिंचोलीच्या स्वागत मलगुंडे याने नुकत्याच नांदेड येथे झालेल्या पहिल्या ऑल इंडिया पिंच्याक सिलाट राष्ट्रीय चॅम्पियनशिप २०२३-२४ स्पर्धेत कांस्यपदक पटकावले.
ही स्पर्धा १८ व १९ फेब्रुवारी दरम्यान डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स श्री गुरुगोविंद सिंगजी स्टेडियम, नांदेड येथे आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेसाठी जम्मू-काश्मीर, दिल्ली, हरियाणा, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, आसाम, मणिपूर, पश्चिम बंगाल, केरला, आंध्रप्रदेश अशा २० राज्यातील एकूण ७०० खेळाडूंनी तर महाराष्ट्रातील एकूण २०० खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता.
मिळालेल्या संधीचे सोने करत स्वागतने टॅंडिंग (फाईट) प्रकारामध्ये कांस्यपदकाची कमाई केली. स्वागतने क्लास सी गटामध्ये ३६ ते ३९ या वजनी गटात जम्मू-काश्मीर, मध्यप्रदेश व हरियाणाच्या खेळाडूंना कडवी झुंज देत कांस्यपदक आपल्या नावी केले. इंडियन पिंच्याक सिलाटचे अध्यक्ष श्री. किशोर येवले व मॅच डायरेक्टर इरफान अजीज भूत्तो यांच्या हस्ते स्वागताला कांस्यपदक प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
या यशासाठी स्वागतला शाळेचे पिंच्याक सिलाट प्रशिक्षक साहेबराव ओव्हाळ व मुख्याध्यापिका सरिता शिंदे यांनी मार्गदर्शन केले. विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या विश्वस्त सौ. सुनेत्रा पवार, उपाध्यक्ष ॲड. श्री. अशोक प्रभुणे, सचिव ॲड. नीलिमा गुजर, खजिनदार श्री. युगेंद्र पवार, विश्वस्त श्री. आर. एम. शहा, श्री. किरण गुजर, श्री. मंदार सिकची, रजिस्ट्रार कर्नल. श्रीष कंबोज यांनी स्वागतचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.











