ज्ञानेश्वर रायते – महान्यूज लाईव्ह
खुद्द शरद पवार यांनी ट्विटमध्ये अहमदाबादमध्ये भारतातील पहिल्या लेक्टोफेरीन उद्योगाचे उदघाटन केल्याचा गौतम अदानींसोबतचा फोटो शेअर केला आणि भारतात जणू मोठा राजकीय भूकंप झाल्याचा स्फोट झाला. त्यात काय असं, शरद पवार तर काय गौतम अदानींना वारंवारच भेटतात असा उपरोधिक टोला भाजपने मारला, मग भाजपच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या गोदी वृत्तवाहिन्या व प्रिंट मिडीयानेही त्याची री ओढत कॉंग्रेसच्या इंडियात राहूल गांधींना कोणी विचारतच नाही, शरद पवार अदानींसोबतच आहेत वगैरे वगैरे सारा जावईशोध लावला..
शरद पवार यांनी एका शब्दात स्पष्ट केले, मात्र त्यात बहुदा कोणाला रस नव्हता, कारण सरळच आहे, शरद पवारांना राजकीय दृष्ट्या बदनामीत ठेवणं एवढंच त्यामागचा दिल्ली पुणे मुंबईतल्या तथाकथित ज्येष्ठ पत्रकारांचा हेतू असतोच. कारण शरद पवार यांनी जे स्पष्टीकरण दिले होते, त्यावर खरी चर्चा व्हायला हवी होती आणि तो मुद्दा होता, बारामतीकर उद्योजकाने अहमदाबाद येथे सुरू केलेल्या कारखान्याचा.. भारतातील पहिल्या अशा एका उत्पादनाचा, ज्यातून भारतातल्या 140 कोटी लोकांचा आरोग्याच्या दृष्टीने प्रचंड फायदा होऊ शकेल! पण अर्थातच सारी चर्चा फक्त राजकीयच झाली, मात्र ज्या उद्योजकाने बारामतीतून थेट गुजरातेवर स्वारी करीत तेथे आपले बस्तान बसवले, त्याच्या कर्तृत्वाकडे कोणाचेच लक्ष गेले नाही.
तर हे कर्तृत्ववान कुटुंब आहे, पुणे स्थित कंपनी एक्झिमपॉवर इनोव्हेशन कंपनीचे प्रमुख प्रकाश खलाटे! या प्रकाश गणपत खलाटेंची फारशी माहिती अद्याप आम्हालाही नाही, मात्र ते बारामती तालुक्यातील शिरष्णे गावचे रहिवासी आहेत. त्यांनी सन २०१४ मध्ये एक्झिमपॉवर इनोव्हेटीव्ह कंपनीची स्थापना केली. सातत्याने नाविण्याचा वेध घेणाऱ्या प्रकाश खलाटे यांनी देशाला अभिमान वाटावा अशी गोष्ट साकारली आहे, ज्यात खुद्द गौतम अदानींनाही सहभाग घेण्यापासून स्वतःला रोखता आले नाही.
दरदिवशी १०० टन लेक्टोफेरीन चे उत्पादन करणारा कारखाना खलाटे यांनी गुजरातेतील अहमदाबाद येथे सुरू केला आहे, त्याचेच उदघाटन शरद पवार व गौतम अदानी यांनी संयुक्तपणे केले. गौतम अदानींनी या उद्योगाला सहकार्य केले म्हणून आणि माझ्या मातीतला माझा नेता म्हणून शरद पवार यांना या कारखान्याच्या उदघाटनासाठी आमंत्रित करण्यात आले होते ही खरी बातमी आहे.
मात्र चर्चा झाली ती, बातमीमागच्या नसलेल्या बातमीची. तशाही अशा बातम्या पुणे, मुंबईतले असे पत्रकार किंवा तथाकथित सो कॉल्ड संपादक रात्रीच्या आठनंतर काही उत्तेजक पेय घेऊन सुरू करतात कोणत्यातरी कट्ट्यावर! अन् मग तिथून ती बातमी राष्ट्रीय स्तरावरती पोहोचते अशीच सूत्रासूत्रानुसार..! खरंतर मराठमोळ्या अल्पभूधारक शेतकऱ्याने घेतलेली प्रचंड झेप ना मिडियाच्या लक्षात आली, ना राजकीय नेत्यांच्या.. किंबहुना त्यात कोणाला रसही नसेल, मात्र शरद पवार यांनी त्याचे खंडन करताना खूप महत्वाची गोष्ट सांगितली, ती म्हणजे हे लेक्टोफेरीन मोठ्या प्रोटिनयुक्त गोष्टींचा भाग आहे, नुकत्याच जन्मलेल्या बाळाला आई जे दूध पाजते किंवा नुकत्याच व्यालेल्या गाईचा चिक असेल, यामध्ये जेवढे प्रोटिन्स असतात, जेवढे रोगप्रतिकारक गुण असतात, तेवढेच गुण या लेक्टोफेरीनमध्ये असणार आहेत, तो भारतातील पहिलाच उद्योग आहे.
आणि हा उद्योग बारामती तालुक्यातील मूळच्या शिरष्णे येथील रहिवासी असलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्याच्या मुलाने प्रचंड कष्ट करून अनेक वर्षे त्यासाठी प्रयत्न करून तयार केला आहे हे यातील मुख्य विशेष आहे. गुजरातमधील वासना भागातील चाचरवाडी भागात हा कारखाना सुरू करण्यात आला असून गेल्या काही वर्षांपासून खलाटे कुटुंबिय सध्या तेथे वास्तव्यास आहे.
अर्थात शिरष्णेतील निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार खलाटे कुटुंबियातील कोणी ना कोणी सदस्य दर महिन्याला किंवा दोन महिन्याला गावी व घरी येत असतात. गावी प्रकाश खलाटे यांचे चार भाऊ राहतात. खलाटे यांनी सुरवातीला २०१४ मध्ये या कंपनीची स्थापना पुण्यात उंड्री येथे केली होती. आज त्याचा विस्तार गुजरात राज्यापर्यंत झाला आहे.
खरंतर यापेक्षा जास्त चर्चा झाली ती, शरद पवार गौतम अदानींना भेटले याचीच. मात्र त्यांच्या या भेटीत बारामतीकर मराठमोळ्या उद्योजकाची जगण्याची व आयुष्याची लढाई मात्र तशीच राहीली, विकृतीच्या अंधारलेल्या राजकारणाच्या साठमारीत. वास्तविक पाहता बारामतीच नव्हे तर महाराष्ट्रातल्या युवा, तरुण पोरासोरांपर्यंत याची कहाणी जायला हवी होती की, या व्यक्तीने किती कष्ट केले असतील? अत्यल्प पैशातून त्यांनी १० वर्षे नेमका कसा अभ्यास केला असेल? एकाच गोष्टीच्या उत्पादनासाठी त्यांनी स्वतःला किती झिजवले असेल? पण भारतात मूळ गोष्टी राहतात ना तशाच मागं नेहमीसारख्याच..!











