यशकथा एका शून्यातल्या विश्वाची….
इंदापूर : महान्युज लाईव्ह
शिक्षण सम्राटांसाठी कुरण ठरलेली विना अनुदानित महाविद्यालयांतील शिक्षक, प्राध्यापक आणि प्राचार्यांची व्यथा आजही संपत नाही.. एवढेच नाही, खाजगी इंग्रजी शाळा देखील त्याला अपवाद नाहीत… महिना तीन हजारापासून सहा हजार रुपयांपर्यंत पगार असलेल्या शिक्षकांनी खूप चांगलं शिकवावं अशी अपेक्षा एकीकडे आणि त्याला तेवढ्या पैशात जगता येत नाही ही वस्तुस्थिती दुसरीकडे…! अशा विवंचनेत सध्या राज्यातील हजारो जण काम करताहेत… इंदापूर तालुक्यातही भीमा नदीकाठचा मुलगा काहीतरी मोठं व्हायचं म्हणून एमए. एमएड. झाला, प्राचार्य देखील झाला, पण फक्त पद मिळालं, पगार मात्र तेरा हजार रुपयांचाच.. येण्या जाण्यातच हा पैसा संपायचा… एक दिवस झुगारून दिली नोकरी आणि स्वतःचा व्यवसाय सुरू केला… आज तीन वर्षातच साडेपाच कोटींची वार्षिक उलाढाल करणारा व्यवसाय त्याच्या गाठीशी असून महिन्याला तेरा हजार रुपये पगार घेणारा हा प्राचार्य आज दिवसाला तेरा हजार रुपये मिळवतो…!
ज्याच्या मनात आभाळभर उंची गाठायचं स्वप्न आणि ध्येय असेल आणि त्यासाठी काहीही करायची जिद्द असेल तर त्यांच्यासाठी आभाळ देखील ठेंगणे असतं.. रविंद्र मनोहर ढुके… इंदापूर तालुक्यातील अगोती नंबर 2..हे त्यांचे गाव.. उजनी काठच्या या गावात त्यांची एकत्रित कुटुंबाची पंचवीस एकर शेती आहे. मुले शिकली पाहिजेत, मोठी झाली पाहिजेत, शेतीत सगळ्यांनी एकत्र काम करता कामा नये या भावनेने पूर्वी हमाली काम करत करत शेती वाढवलेल्या मनोहर ढुके यांनी रवींद्र यांना शिक्षणासाठी पाठबळ दिले. रवींद्र यांनीदेखील त्यांचा शब्द पूर्ण करत एम ए एम एड पूर्ण केले. नेट ची परीक्षा दिली, त्यानंतर ज्युनियर रिसर्च फेलोशिप मिळवली. बराच प्रयत्न केला परंतु कुठे नोकरी मिळाली नाही, म्हणून मग दोन वर्षे शेती केली. एके दिवशी इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथील विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक पदाची जागा रिक्त असल्याचे त्यांना समजले आणि तेथे मुलाखतीसाठी पोहोचले मुलाखत छान झाली ते प्राध्यापक म्हणून तिथे नियुक्त झाले दोन वर्षातच तेथील प्रभारी प्राचार्य पदाचा पदभार त्यांना मिळाला या संपूर्ण काळात महाविद्यालयांमध्ये वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी घेऊन या महाविद्यालयात तील वातावरण त्यांनी हसते खेळते बनवले.
या काळात त्यांचा पगार वाढून 13 हजारावर आला. भवानीनगर ते अगोती हे अंतर साधारणपणे 45 ते 46 किलोमीटरचे.. दररोज घेऊन जाऊन ढुके यांना मानसिक व शारीरिक त्रास जाणवू लागला आणि अशाच वातावरणात अनुदानित शाळेमध्ये शिक्षक म्हणून रुजू होण्यासाठी एका मित्राने चक्क पन्नास लाख रुपये दिल्याची एक माहिती त्यांना मिळाली आणि त्यांचे डोके चक्रावून गेले.. एवढे पैसे मोजल्यानंतरही दुसर्याचीच चाकरी करायची आहे, त्यापेक्षा थोडे पैसे घेऊन स्वतःचा एखादा व्यवसाय केलेला बरा असा विचार त्यांनी केला. तो घरी बोलून दाखवला. नेहमीप्रमाणे घरच्यांनी पाठबळ दिले आणि एकत्र कुटुंबाचा एक नवा व्यवसाय त्यांनी सुरू केला. शेतीची खते तसेच शेतीपूरक व्यवसायाला लागणारी आवश्यक साधने त्यांनी विकायला सुरुवात केली. हळूहळू त्यामध्ये चांगला जम बसला. स्वभावाचे वैशिष्ट्ये कामाला आले आणि या व्यवसायामध्ये रवींद्र ढुके चांगलेच स्थिरावले. आता त्यांच्या या व्यवसायाचा वार्षिक उलाढालीचा टप्पा साडेपाच कोटींवर पोहोचला आहे. कधी काळी महिन्याला तेरा हजार रुपये पगार घेणारे रवींद्र आता दिवसाला देखील 13 हजार रुपयांचे उत्पन्न मिळवतात.
रवींद्र ढुके आजवरच्या प्रवासाबद्दल म्हणतात,’ जरी मी महाविद्यालयांमध्ये कमी पगारावर होतो, तरीदेखील एक धडा मात्र आवर्जून मिळाला, तो म्हणजे तुम्ही सातत्याने कष्ट करायचे आहे. आज जेव्हा एका दिवसाचे उत्पन्न तेरा हजार रुपये वर जाते, तेव्हा मात्र आवर्जून पाठीमागचा सारा प्रवास डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही.’










