सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : इंदापूर तालुक्यातील सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील कडेच्या गावांमध्ये बिबट्या आढळून आल्यानंतर काल अचानक पश्चिम भागातील जाचक वस्ती, बेलवाडी, सणसरच्या शिवेवर लोकांना बिबट्या दिसून आला. बारामती तालुक्यातील कन्हेरी व कारखेल भागानंतर आता मुढाळे व पश्चिम भागामध्ये बिबट्या दिसतोय; दौंड तालुक्यातील पाटस भागात दिसतोय; त्यामुळे एकाच वेळी इतके बिबटे तीन तालुक्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी दिसत असल्याने हे कोणी जाणीवपूर्वक आणून सोडलेत का? अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये आहे.
मागील दोन वर्षांमध्ये कोरोना आणि एकूणच शेती मधील मरगळ आल्याने अगोदरच शेतीचे उत्पन्न कमी आहे. त्यात बिबट्याच्या भीतीमुळे शेतामधील मजूर कामावर येण्यास कचरत आहेत आणि एकाच वेळी तीन तालुक्यांमध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये एक तर दिसत आहेत किंवा त्याच्याविषयीच्या अफवा उठत आहेत. मात्र या सर्व प्रकरणामुळे शेतीची फार मोठी हानी होऊ लागली आहे.
काल (ता.४) जाचक वस्ती परिसरातील शेतकऱ्यांना शेतामध्ये अचानक बिबट्याचे दर्शन झाले. त्याची माहिती लक्षात आल्यानंतर शेतकऱ्यांनी इतर शेतकऱ्यांना माहिती करून दिली व त्यानंतर जाचकवस्ती गावात दवंडी देखील देण्यात आली. त्यानंतर मात्र दुपारपर्यंत शेजारच्या आजूबाजूच्या भागात देखील शेतकऱ्यांनी या भागात बिबट्या आला असल्याचे माहिती दिली.
हा परिसर सणसर, बेलवाडी, जाचकवस्ती या तीन गावांच्या सीमेवर येत असल्याने तीनही गावातील शेतीच्या कामावर काल परिणाम झाला. त्यामुळे फक्त आसपासच्या तालुक्यांमध्ये बिबट्या दिसून येतो, अशी माहिती ऐकून असलेल्या शेतकऱ्यांची तो आता आपल्या शेजारी आला असल्याचे ऐकूनच भीतीने गाळण उडाली आहे.
दरम्यान एकाचवेळी तीन तालुक्यात दिसणाऱ्या या बिबट्या मुळे मागील वर्षीचा महापूर वगळता या तीन तालुक्यात तसेही काही विशेष घडत नाही, म्हणून तर हे बिबटे जाणीवपूर्वक जास्त संख्या झाल्यामुळे येथे आणून सोडले नाहीत ना? अशी एक गमतीदार चर्चा देखील शेतकऱ्यांमध्ये ऐकायला मिळाली.











