सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यातील अंथुर्णे येथील युवा डॉक्टर मधुकर रामचंद्र धापटे यांचा काल रात्री कोरोनावरील उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे ते निकटवर्तीय होते.
मागील महिन्यात डॉ. धापटे यांना कोरोनाची लागण झाली. यानंतर त्यांना बारामतीत खासगी दवाखान्यात उपचार घेतल्यानंतर त्रास वाढल्याने पुण्यातील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे काही दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान हा त्रास कमी न झाल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
मागील महिन्यात 19 एप्रिलच्या दरम्यान डॉक्टर धापटे यांना ताप आला. त्यांनी बारामतीतील वरिष्ठ डॉक्टरांशी चर्चा करून, त्यांचे मार्गदर्शन घेऊन औषध उपचार घेतला, मात्र ताप कमी होत नसल्याने त्यांची कोरोनाची चाचणी करण्यात आली. ती निगेटिव्ह आली. त्यानंतर देखील ताप कमी होत नसल्याने 23 एप्रिल रोजी पुण्यातील खासगी दवाखान्यात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. 26 एप्रिल रोजी पुण्यातील दवाखान्यातून डिस्चार्ज घेऊन ते बारामतीत उपचारासाठी दाखल झाले. या दरम्यान मात्र त्यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र त्यानंतर पुन्हा त्रास वाढला आणि त्यांना पुन्हा बारामतीतून पुण्यातील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेव्हापासून त्यांची कोरोनाशी झुंज सुरू होती.
त्यांच्या मृत्यूने भवानीनगर, काटेवाडी, सणसर, अंथुर्णे, शेळगाव, भरणेवाडी परिसरातील नागरिकांना धक्का बसला, तसेच इंदापूर तालुक्यातील बारामती तालुक्यातील डॉक्टरांनीही हळहळ व्यक्त केली. कोरोना वरील उपचारादरम्यान इंदापूर तालुक्यात साडेतीनशेहून अधिक नागरिकांचा आत्तापर्यंत बळी गेला आहे, तर बारामती तालुक्यातील मृतांची संख्या 600 वर पोहोचली आहे. अशा परिस्थितीत देखील कोरोनाला अगदी सहजपणे नागरिक घेत आहेत. मात्र कोरोना वर उपचार करणारे डॉक्टर देखील याला बळी पडत आहेत, हे लक्षात घेऊन कोणतीही लक्षणे आढळली, तर तातडीने दवाखान्यात जाऊन उपचार ला सुरुवात करण्याची गरज नागरिकांनी लक्षात घेण्याची आवश्यकता आहे.











