बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती तालुक्यात परवा 5 मे रोजी तपासलेल्या 1339 संशयित रुग्णांपैकी 384 जण कोरोनाग्रस्त आढळले आहेत, तर पाच मे रोजी दिवसभरात 378 जण कोरोना मुक्त झाले आहेत. परवा दिवसभरात बारामती तालुक्यातील 21 जणांचा तर तालुक्याबाहेरील 9 जणांचा मृत्यू झाला. या एकाच दिवशी बारामतीत उपचार घेत असलेल्या तीस जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तालुक्याची एकूण रुग्णसंख्या 19,610 वर पोहोचली आहे.
बारामती तालुक्यात राज्य सरकारने लागू केलेले कडक निर्बंध सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत कोरोना चे रुग्ण संख्या कमी होणे अपेक्षित होते, परंतु अद्यापही कोरोनाचे रुग्ण संख्या कमी होताना दिसत नाही. त्यामुळे बारामतीत संपूर्ण लॉकडाऊनची आखणी प्रशासनाने केली. त्यानुसार पाच मे पासून हे लॉकडाऊन सुरू झाले आहे. पाच मे रोजी तपासलेल्या 1339 रुग्णांपैकी 145 जणांचा अहवाल बाकी होता, त्यामध्ये 52 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून परवा तपासलेल्या रूग्णांमधून 332 पॉझिटिव्ह आले होते, त्यामुळे पाच मे रोजी तपासलेल्या एकूण नमुन्यांपैकी 384 कोरोनाग्रस्त आढळले आहेत.
लसीचे डोस अपुरे; गर्दी करू नका
तालुक्यातील लसीकरणाची संख्या एक लाखाच्या आसपास पोहोचली असली तरी, आज (7 मे) रोजी संपूर्ण तालुक्यात फक्त एक हजार डोस उपलब्ध आहेत. प्रत्येक प्राथमिक केंद्रावर फक्त शंभर डोस दिले जाणार आहेत. त्यामुळे लसीकरणाच्या ठिकाणी गर्दी करु नये असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी केले आहे.











