नानाची टांग
माऊली ती सांगून गेली.. पैल तो गे काऊ कोकताहे..
माझ्या झोपडी, अन रानात माझे दुःख सारे वाहत आहे..
तुझे रंग नऊ नवाचे.. रंग दुःखाचा कोणताहे? ती रात्र कसली हो? काळरात्र ती, स्वप्ने सारी घेऊन गेली..
उध्वस्त कराया सारे ते, वीज कशी ती लख्ख लखाखली.. कच्चीबच्ची सगळी माझी, उष्ट्या ताटी तशीच निजली..
जमीन गेली खरवडून, अन पिके नेली ओरपून ती..
अस्मानी अन सुल्तानीचा डोंगर ती पाचवीला पुजून गेली..
मका झिरपली पाण्यात..अन कणसे पुन्हा उगवली..
दिवस तुझा लाल साडीचा..मी कवेत दुःख पांघरली..
तुझ्या लाल साडीचा फोटो.. माझी जमीन पाणी वाहे..
तुझे रंग नऊ नवाचे..माझ्या दुःखाचा रंग कोणताहे..?
तुझ्या साडीचा रंग पिवळा..अन सोनेरी हा मळवट गं..
कष्टकऱ्यांचा अवघा रस्ता, दुःखात तेव्हा न्हाला गं..
पाणी नव्हेच, ते रक्त शोषक, शोषले अवघे सुख गं..
जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी..बळीराजा अवघा उपाशी गं..
तो दिवस तुझा मोरपिशी.. अन रंग तो निळसर होता..
त्या दिवशी माझा बळीपुत्र पंचनाम्याला तिष्टत होता..
पंचनाम्याला तलाठीच तो, माजुर्डा गं पिडत होता..
नसेल ललाटी ते लिहील तलाठी, म्हणून भीतीनं गप्प होता..
पंचनामा असा, जसा की, तलाठ्याच्या बापाचा खेळ…
डोंगराएवढे दुःख रोखण्या, सरकार सुध्दा घेतं वेळ..
इथंच होती, द्राक्षवेल अन इथंच होती व्याली केळ..
उरलं नाही, काहीच आता, दादा तुम्ही जाणा वेळ..!
आला नाही, तुम्ही परवा, दिसलं असतं पाणीच पाणी..
दुकानातच नाही माझ्या, स्वप्नावरही फिरलं पाणी..!!
जरी रुबाबात असा तुम्ही, आदर आम्हा तसाच आहे..
भाऊ, तुमच्यावर नाही रोष.. नाही कसला राग आहे..
दुःख आमचे सावरण्या, शक्ती आमुची क्षीण आहे..
सावरण्या सारा घरगाडा, कुठे आम्हाला वेळ आहे..
रंग तुमचे नऊ नवाचे.. रंग दुःखाचा कोणताहे?
गोंधळाचे दिले आमंत्रण, नवरात्रही आता सरली..
काळी आई देते पोटभर, म्हणून आजवर मेहनत केली..
रात्रीच्याही पोटात असतो, म्हणे उषःकाल उद्याचा..
नऊ दिसाचा नवरंग हा, आमच्या नाही कामाचा.. !
पाण्यात गुंतलो, चिखलात रुतलो..गंध होता मातीचा..
दुःखात कुढलो,रडलो पण लढलो..पुरूनी उरलो एकदाचा….!!
शतकामागून शतके गेली.. पिढ्यापिढ्यांचा बट्टा रं..
काळ्या माती रांगोळी काढे, बा च्या हाती घट्टा रं.
अशा गुलामी आसूड ओढण्या, बळीराजा तो अधीर रं.
रुधीराचे पाणी करण्या, धमन्या आजही ताज्या रं…
पण, रंग नवाचे नऊच फक्त, अजून उजाडत नाही रं..!
अजून उजाडत नाही रं…!!











