मुंबई : महान्यूज लाईव्ह
अभिनेते आणि पर्यावरणप्रेमी सयाजी शिंदे यांनी व्यक्त केलेल्या खंतपूर्ण विधानानंतर राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. अजितदादांनी झाडांच्या चळवळीला साथ देण्याचा शब्द दिला होता पण आता एकही आमदार फोन उचलत नाही. या त्यांच्या वक्तव्यामुळे पर्यावरण आणि राजकारणाचा संबंध पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे पर्यावरणाविषयीचे विशेष आकर्षण. अजितदादांची ओळख केवळ आक्रमक प्रशासक अशी नव्हती तर हिरवाई आणि जलसंधारण जपणारे संवेदनशील नेतृत्व अशीही होती. हरित विकास, वृक्षारोपण, तलाव संवर्धन आणि ‘पाणी अडवा-पाणी जिरवा’ उपक्रमांमध्ये त्यांची विशेष रुची होती. त्यामुळेच सयाजी शिंदे यांच्या ‘देवराई’ मोहिमेला त्यांनी सकारात्मक पाठिंबा देत महाराष्ट्रात मोठी हरित चळवळ उभी करण्याचे स्वप्न पाहिले होते.
याच पार्श्वभूमीवर आता एक महत्त्वाचा प्रश्न चर्चेत आला आहे. दिवंगत अजित पवार यांनी दिलेल्या हरित स्वप्नाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार नवी दिशा देणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे सक्रिय राजकारणात येण्यापूर्वी सुनेत्रा पवार या एन्व्हाॅर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण आणि जलसंधारण यांसारख्या उपक्रमांमध्ये कार्यरत होत्या. ग्रामीण भागात पर्यावरण जनजागृती, हरित मोहिमा आणि नैसर्गिक संसाधन संवर्धनासाठी त्यांनी विविध उपक्रम राबविले असल्याने सयाजी शिंदे यांच्या ‘देवराई’ अभियानाबाबत त्या सकारात्मक भूमिका घेऊ शकतात अशी शक्यता आता व्यक्त होत आहे.
अजितदादांचा शब्द, सुनेत्रा पवारांची जबाबदारी
सयाजी शिंदे यांनी दावा केला होता की अजितदादांनी राज्यातील प्रत्येक मतदारसंघात ‘देवराई’ उभारण्याची संकल्पना मांडली होती. जास्तीत जास्त आमदार निवडून आले तर प्रत्येक ठिकाणी झाडांची चळवळ उभी करू असा शब्द त्यांनी दिला होता असे सयाजी शिंदे यांनी सांगितले. मात्र अजितदादांच्या निधनानंतर ही चळवळ राजकीय आधाराशिवाय अर्ध्यावर राहिल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
आज पर्यावरणासाठी फोन केला तर अनेक लोकप्रतिनिधी प्रतिसाद देत नाहीत अशी खंत त्यांनी बोलून दाखवली. यामुळे आता पर्यावरणप्रेमींच्या नजरा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे लागल्या आहेत. कारण पर्यावरण विषयाशी आधीपासून असलेला त्यांचा संबंध आणि सामाजिक उपक्रमांमधील सक्रियता पाहता त्या सयाजी शिंदे यांच्यासोबत चर्चा करून या हरित मोहिमेला नवी ऊर्जा देऊ शकतात अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
‘देवराई’ला मिळणार का नवे राजकीय बळ..
राज्यात वाढती वृक्षतोड, शहरीकरण आणि विकासकामांच्या नावाखाली कमी होत चाललेली हिरवाई यामुळे पर्यावरणाचा प्रश्न गंभीर बनत आहे. अशा वेळी सयाजी शिंदे यांची ‘देवराई’ चळवळ आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची पर्यावरण क्षेत्रातील पूर्वीची बांधिलकी यांचा संगम झाला तर महाराष्ट्रात मोठी हरित चळवळ उभी राहू शकते अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
दरम्यान सयाजी शिंदे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की झाडे लावणे सोपे आहे पण ती जगवणे महत्त्वाचे आहे. त्यांनी केवळ दिखाऊ वृक्षारोपण कार्यक्रमांवर टीका करत दीर्घकालीन पर्यावरण धोरणाची गरज अधोरेखित केली. आता राजकीय वर्तुळात एकच प्रश्न चर्चिला जात आहे. अजितदादांनी पाहिलेलं हिरवं स्वप्न उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार प्रत्यक्षात उतरवणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.











