मिरज (जि. सांगली) : महान्यूज लाईव्ह
लडाखमधील गांधीवादी विचारवंत, पर्यावरण कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांच्यावर देशद्रोहाचा आरोप ठेवत राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत करण्यात आलेल्या कारवाईचा मिरज येथील शेतकरी संघटनेच्या कार्यकारिणी बैठकीत तीव्र निषेध नोंदवण्यात आला. त्यांच्या तात्काळ मुक्ततेची मागणी करत एकमताने ठराव मंजूर करण्यात आला.
बैठकीत विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित असलेल्या अमर हबीब यांनी सोनम वांगचुक यांच्या कार्याचा सविस्तर आढावा घेतला. लडाखसारख्या कठीण भौगोलिक परिस्थितीत शिक्षण आणि पर्यावरण संवर्धनासाठी त्यांनी केलेल्या कामांची माहिती त्यांनी मांडली. तसेच त्यांच्या अटकेची पार्श्वभूमी आणि त्यामागील परिस्थिती यावरही त्यांनी भाष्य केले.
सैनिकांच्या कुटुंबातून आलेल्या सोनम वांगचुक यांनी अत्यंत थंड प्रदेशात कार्यरत असलेल्या भारतीय सैनिकांसाठी सौरऊर्जेवर आधारित विशेष तंबू विकसित केले आहेत. देशसेवेसाठी योगदान देणाऱ्या व्यक्तीवर देशद्रोहाचा ठपका ठेवणे हे अन्यायकारक असल्याची भावना बैठकीत व्यक्त करण्यात आली. केंद्र सरकारने मागील निवडणुकांदरम्यान दिलेल्या आश्वासनांची पूर्तता व्हावी, हीच त्यांची मागणी असल्याचेही ठरावात नमूद करण्यात आले.
हा ठराव शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी मांडला, तर कार्याध्यक्ष कालिदास आपेट यांनी त्यास अनुमोदन दिले. कार्यकारिणीतील सर्व सदस्यांनी हात वर करून ठरावाला समर्थन दर्शवले. ठरावात पुढे म्हटले आहे की, सोनम वांगचुक यांची तात्काळ सुटका करण्यात यावी, या मागणीसाठी देशभरातील नागरिकांनी शांततापूर्ण मार्गाने आवाज उठवावा. विविध सामाजिक संघटना आणि चळवळींनी एकत्र येत या प्रश्नावर एकजूट दाखवावी, असे आवाहन रघुनाथदादा पाटील, कालिदास आपेट, शिवाजी नांदखिले आणि डॉ. प्रगती चव्हाण यांनी केले. बैठकीस विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधी उपस्थित होते.
दरम्यान, “सोनम वांगचुक यांना मुक्त करा” या मागणीचे फलक राज्यातील गावोगावी लावण्यात येणार असल्याची माहिती रघुनाथदादा पाटील यांनी दिली. त्यांच्या मुक्ततेसाठी व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.











