इंदापूर : महान्यूज लाईव्ह
छत्रपती कारखान्याच्या 21 हजार 172 मालकांना त्यांचा हिरावून घेतला जात असलेला हक्क मिळवून देणे हा एक प्रामाणिक प्रयत्न होता, उच्च न्यायालयामध्ये आम्ही गेलो नव्हतो, जे आमच्यावर आरोप करत आहेत, तेच गेले होते आणि तेच तोंडघशी पडले आहेत, उगीचच आपल्या चुकांचे खापर दुसऱ्यावर फोडण्याची गरज नाही असे प्रत्युत्तर छत्रपती कारखान्याच्या वतीने अध्यक्ष प्रशांत काटे यांनी कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांना दिले.
छत्रपती साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करताना सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल असताना अजित पवार हे सरकारी यंत्रणेचा वापर करत कारखान्याची निवडणूक राज्य निवडणूक प्राधिकरणाला घेण्यासाठी दबाव टाकत आहेत असा आरोप केला होता. त्या पार्श्वभूमीवर कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे व उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी या आरोपाला उत्तर दिले.
प्रशांत काटे व अमोल पाटील म्हणाले, छत्रपती कारखान्याची उभारणी करताना या सर्वसामान्य सभासदांनी पोटाला चिमटा घेऊन शेअर्स उभे केले. या कारखान्याचा मालक हा सर्वसामान्य सभासद आहे. त्यालाच या कारखान्याच्या निर्णय प्रक्रियेतून वंचित करणे म्हणजे मोठा अन्याय आहे. आमची पूर्वीपासून भूमिका हीच होती की, अनेक विविध कारणांमुळे या सभासदांना अडचणी आल्या असतील, मात्र त्यांना थेट त्यांच्या हक्कापासूनच वंचित करणे हे योग्य नाही.
याउलट विरोधकांनी जाणीवपूर्वक या सभासदांना निर्णय प्रक्रियेतून म्हणजे मालक होण्यातून बाजूला करण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला आणि वेळोवेळी ते तोंडघशी पडले. आता देखील उच्च न्यायालयात त्यांनीच याचिका दाखल केली होती आणि ही याचिका फेटाळली गेली. ती का फेटाळली याचे विस्तृत आत्मचिंतन करण्याऐवजी ते नेतेमंडळींना दोष देत आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे आमचे लोकनेतृत्व आहेच, शिवाय अजित पवार यांनी सातत्याने कारखान्याला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी शक्य असलेले सगळे प्रयत्न व शक्य असलेली सगळी मदत केलेली आहे. उलट त्यांच्याशी सातत्याने जुळवून घेण्याचे प्रयत्न संबंधित विरोधक मंडळी, सातत्याने करतात, तरी देखील त्यांच्यावर आरोप करतात हे सर्वथा योग्य नाही.
कारखान्याची निवडणूक तोंडावरच असल्याने जे काही आरोप प्रत्यारोप होतील, त्याला योग्य प्रकारे आम्ही उत्तर देऊच, मात्र एखाद्या चुकीच्या पद्धतीने एखाद्या गोष्टीचे समर्थन करून लोकांमध्ये वेगळा संदेश जाऊ नये यासाठी खुलासा करणे अत्यंत महत्त्वाचे होते. वास्तविक पाहता आम्ही सभासदांचा मान आणि सन्मान योग्य राखला जाईल, यासाठी न्यायाची अपेक्षा केली आणि योग्य न्याय मिळाला. मात्र मिळालेला हा न्याय एखाद्याला चुकीचा वाटत असेल तर त्यांनी अजूनही जे शक्य आहेत तो पाठपुरावा करावा, मात्र विनाकारण कोणावर टीका करू नये.











