विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
बारामती : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या २०२५-३० निवडणुकीची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे.जवळपास १९ हजार ५४९ सभासद मतदानाचा हक्क बजावणार आहेत. अंतिम मतदारयादी प्रसिद्ध झाल्यानंतर माळेगांव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. अजित पवार गटाचा गटनिहाय सभासद संपर्क दौरा आजपासून सुरू झाला आहे.
तर दुसरीकडे शरद पवार गटाचे नेते युगेंद्र पवार यांनीही कारखान्याबद्दल प्रचंड अस्वस्थता आहे, शेतकऱ्यांमध्ये जर स्वाभिमानी शेतकरी, स्वाभिमानी सभासद जर कारखान्यासाठी निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असतील, तर आम्ही आमची पूर्ण ताकद त्यांच्या पाठीमागे लावणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे या कारखान्याच्या निवडणुकीत दोन पॅनल होणार की तीन याकडे साऱ्यांचेच लक्ष आहे.
सध्या महायुती असल्याने कारखान्यातील पारंपारिक विरोधक असलेले माजी अध्यक्ष रंजन तावरे, ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे हे नेमके काय भूमिका घेणार?त्यामुळे माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुक दुरंगी होणार की तिरंगी याकडे सर्व सभासदांचे लक्ष लागले आहे.
माळेगाव कारखाना पंचवार्षिक निवडणूक बारामतीचे प्रांताधिकारी वैभव नावडकर यांच्या अधिपत्याखाली होणार आहे. तसे नियुक्ती पत्र पुणे जिल्हा सहकारी निवडणूक प्राधिकरण विभागाने अधिकारी वैभव नावडकर यांना पाठवले आहे.











