बारामती : महान्यूज लाईव्ह
गेल्या काही दिवसांपासून बारामती वाहतूक शाखेचे पोलीस चौका चौकात थांबून बुलेट स्वरांना सूचना करत होते बारामतीत कायदा सुव्यवस्थेबरोबरच शांतता सुद्धा राखण्याची गरज आहे हे अगदी विनवून विनवून सांगत होते.. ज्यांनी ऐकले त्यांनी योग्य केले.. त्यांनी ऐकले नाही त्यांना आज बारामतीच्या पोलिसांनी सायलेन्सरच्या फटाका पेक्षा कायद्याचा फटका कसा मोठा असतो ते दाखवून दिले..!
बारामतीच्या पोलिस वाहतूक शाखेने कर्कश आणि मोठा फटाका आवाज असलेल्या बुलेट ताब्यात घेत त्यांचे सायलेंसर जाग्यावरच काढून कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली. या दोन दिवसात पोलिसांनी १३ दुचाक्यांचे सायलेंसर जप्त करून दंडात्मक कारवाई केली. गेल्या काही महिन्यांपासून बारामती वाहतूक पोलिसांनी इथल्या अस्ताव्यस्त वाहतुकीला शिस्त घालून अनेक दंडात्मक कारवाया केल्या व बेशिस्त वाहनचालकांचे मन परिवर्तन केले.
मात्र एवढे करूनही कायद्याचे आणि शिस्तीचे भान नसलेले टुकार चालक अजूनही रस्त्यावर दिसत असल्याने त्यांना शिस्त लावण्यासाठी वाहतूक पोलिसांनी आता मोहीम सुरू केली. तरुणांबरोबरच अनेक प्रतिष्ठित नागरिकही सध्या बुलेटवर फिरताना दिसतात. अनेकांनी कंपन्यांनी ठरवून दिलेल्या दुचाकीच्या आकार व सुविधेऐवजी आपल्या मनाप्रमाणे हवा तसा बदल करून दुचाकी मॉडीफाय केल्या आहेत.
विशेषतः कंपनीचे मूळ सायलेंसर काढून त्या जागी फटाका सायलेंसर टाकून ही वाहने शहरातील प्रत्येक रस्त्यावर मोठा आवाज काढत फिरत आहेत. याचा नाहक त्रास लहान मुले, वयोवृद्ध, मुली, आजारी रुग्णांना होतो आहे. याबाबत वाहतूक पोलिसांनी वेळोवेळी सूचना केल्या, दंडही केले, मात्र काहींना कसलाही फरक पडला नाही.
त्यामुळे कारवाई करण्यासाठी वाहतूक शाखेने वेगळीच मोहीम हाती घेतली. बारामती शहरातल्या चौकाचौकात नाकाबंदी करून अशा बुलेटचे सायलेंसर जाग्यावरच काढून घेऊन किंवा ही वाहने थेट वाहतूक शाखेच्या दालनात नेऊन त्यांचे सायलेंसर काढून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली असून जोपर्यंत काढलेल्या फटाका सायलेंसरच्या जागी दुसरा विना आवाजाचा सायलेंसर जोपर्यंत बसवला जात नाही तोपर्यंत अशी वाहने ताब्यात दिली जात नाहीत.
पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस जवान सुधाकर जाधव, रेश्मा काळे, प्रदीप काळे, स्वाती काजळे, योगेश कातवारे, जलद कृती दलाचे जवान अशोक मोरे, शिवाजी बरकडे, योगेश पळसे, अजय आहेर, हैदर जमादार, सुदर्शन कदम, सुभाष डोंबाळे, प्रिया पावडे, प्रियांका पोफळे, श्रद्धा थोरात, वाहतूक पोलीस जवान अजिंक्य कदम, सुभाष काळे, अशोक झगडे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
आमच्या मोबाईलवर माहिती कळवा.. तुमचे नाव गुप्त राखले जाईल..!
दरम्यान पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी आवाहन केले आहे की, वाहतूक शाखेकडून नागरिकांना वाहतूक नियमांबाबत वारंवार आवाहन केले जाते. प्रसंगी दंडात्मक कारवाई केली जाते, मात्र तरीही काही बेशिस्त चालक नियमांची पायमल्ली करत आहेत. परंतु आता नियम मोडणाऱ्यांविरोधात कडक मोहीम राबवली जाणार आहे. फटाका सायलेंसर लावून कुणी फिरताना दिसला तर किंवा त्रास देत असेल तर 9923630652 या क्रमांकावर संपर्क करा.गाडीचा नंबर कळवा. माहिती देणाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.’











