Indrajeet Sawant on Chhatrapati Shivaji Maharaj. छावा चित्रपटातील प्रसंग व इतिहासातील वास्तव यासंदर्भात विविध वृत्तवाहिन्यांशी बोलताना भूमिका मांडल्यानंतर इतिहासाचे अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना सावंत हे ब्राह्मण समाजात द्वेष पसरवत असल्याचा आरोप करत घरात घुसून मारण्याची धमकी एका व्यक्तीने दिली आहे. या संदर्भातील माहिती इंद्रजीत सावंत यांनीच प्रसारमाध्यमांना दिली आहे.
इंद्रजीत सावंत यांनी या संदर्भात एक फेसबुक पोस्ट लिहिली असून, या संदर्भातील कॉल रेकॉर्डिंग देखील त्यांनी प्रसारित केले आहे. यामध्ये प्रशांत कोरटकर असे हा व्यक्ती नाव सांगत असून जिथे असाल, तिथे येऊन ब्राह्मणांची ताकद दाखवू. घरात घुसून मारू असे म्हणत या व्यक्तीने अर्वाच्य शब्दात शिवीगाळ केल्याचे इंद्रजीत सावंत यांनी स्पष्ट केले आहे.
या व्यक्तीने या संभाषणादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही नाव घेतले असून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबत देखील अवमानकारक वक्तव्य या व्यक्तीने केल्याचा आरोप सावंत यांनी केला आहे. छावा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून सावंत हे वेगवेगळ्या माध्यमांवर इतिहासाविषयीची भूमिका स्पष्ट करत असून इतिहासात घडलेल्या गोष्टींची दाखले देत आहेत. त्यांचे हे दावे ब्राह्मणांच्या विरोधात असल्याचा आरोप संबंधित व्यक्तींनी केला आहे.











