माळेगाव कारखान्याची प्रारूप मतदार यादी २२ जानेवारी रोजी प्रसिद्ध होणार,जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी नीलिमा गायकवाड यांनी प्रसिद्ध केली अधिसूचना
विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
पुणे जिल्ह्यातील व बारामती तालुक्यातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या प्रारूप मतदार यादी अंतिम करण्याबाबतची अधिसूचना जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा पुणे प्रादेशिक साखर सहसंचालक नीलिमा गायकवाड यांनी जाहीर केली आहे. त्यानुसार बुधवारी २२ जानेवारी रोजी माळेगाव कारखान्याच्या मतदारांची प्रारूप सकाळी ११ वाजता प्रसिद्ध केली जाणार आहे.
या चार ठिकाणी यादी होणार प्रसिद्ध
१) पुणे विभागाचे शिवाजीनगरमधील साखर संकुलामधील प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालय पुणे
२)दि माळेगाव सहकारी साखर कारखाना
३)बारामती सहायक निबंधक
४)बारामती तहसीलदार कार्यालयातील सूचनाफलकावर २२ जानेवारीस प्राथमिक मतदार यादी कार्यक्रम प्रसिद्ध केली जाणार
अंतिम मतदार यादी १७ फेब्रुवारी रोजी होणार प्रसिद्ध
यादीवर हरकती, आक्षेप हे २२ ते ३१जानेवारी या कालावधीत संबंधितांना दाखल करता येतील. दाखल हरकती, आक्षेप यांच्यावर ११ फेब्रुवारी रोजी निर्णय घेतला जाईल आणि अंतिम मतदार यादी १७ फेब्रुवारी रोजी प्रादेशिक साखर सहसंचालक आणि माळेगाव कारखान्यावर प्रसिद्ध करण्यात येईल असेही अधिसूचनेत नमूद केले आहे.
माळेगाव कारखान्याच्या सन २०२४-२५ मध्ये होणाऱ्या संचालक मंडळ निवडणुकीकरिता कारखान्याची प्राथमिक मतदार यादी अर्हता दिनांक (कट ऑफ डेट) ही १ जानेवारी २०२५ रोजी निश्चित केली आहे. या अर्हता दिनांकाला अनुसरून संस्थेने सादर केलेल्या पात्र सभासद मतदारांची प्रारूप मतदार यादी कार्यालयीन वेळेत पाहण्यासाठी व तपासणीसाठी जाहीर केलेल्या वरील चारही ठिकाणी उपलब्ध असणार आहे.
आक्षेप व हरकती २२ ते ३१ जानेवारी रोजी घेता येणार
महाराष्ट्र सहकारी संस्था (समिती निवडणूक) नियम २०१४ च्या नियमांन्वये मतदार असणाऱ्या कोणत्याही सभासदास किंवा संस्थेच्या वतीने मतदान करण्यास प्राधिकृत केलेल्या कोणत्याही व्यक्तीला यादीतील नाव किंवा पत्ता किंवा इतर तपशील यांच्या संबंधितातील कोणतीही आकृती किंवा चूक कळवू शकतात.
संबंधितांनी त्यांचे संपूर्ण नाव, पत्ता, दूरध्वनी क्रमांक, भ्रमणध्वनी क्रमांक नोंद करून स्वतंत्ररीत्या लेखी स्वरुपात पुराव्यासह आक्षेप हरकती प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयात २२ ते ३१ जानेवारी या कालावधीत कार्यालयीन वेळेत दाखल करावेत.
त्या तारखेनंतर आलेले आक्षेप हरकती विचारात घेतले जाणार नाही व दिलेल्या कालावधीत आलेले आक्षेप – हरकतींवर निर्णय घेऊन मतदार यादी अंतिम करण्यात येईल असेही जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी नीलिमा गायकवाड यांनी अधिसूचनेत नमूद केले आहे.











