शिरूर : महान्यूज लाईव्ह
शिरूर तालुक्यातील पिंपळसूटी येथे वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बुधवारी पहाटे बिबट्या जेरबंद झाला. आतापर्यंत तालुक्यातील वडगाव रासाई येथे दोन, रांजणगाव सांडस येथे दोन, निमोणे येथे एक व पिंपळसुटी येथे दोन असे ७ बिबटे पूर्व भागात जेरबंद झाले आहेत.
शिरूर तालुक्यात पूर्व भागात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बिबट्याचे दर्शन होत आहे. अनेक नागरिकांना बिबट्या निदर्शनास येत आहे. गेल्या तीन महिन्यात तीन लहान मुलांवर बिबट्याने हल्ले केल्याने तीन मुलांचा मृत्यू झाला होता. यानंतर वनविभागाने पूर्व भागात बिबटे जेरबंद करण्यासाठी मोठी मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार न्हावरे व पूर्व भागात मोठ्या प्रमाणावर पिंजरे लावलेले आहेत. ज्या भागात नागरिकांची मागणी आहे त्यानुसार पिंजरे लावले जातात.
पिंपळसुटी येथील चव्हाणवाडी परिसरात लावलेल्या पिंजऱ्यात बुधवारी पहाटे बिबट्या भक्ष्य खाण्यासाठी आला असता अलगद पिंजऱ्यात जेरबंद झाला. यानंतर तत्काळ वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पिंजरा ताब्यात घेतला.
या बिबट्याची रवानगी माणिकडोह बिबट निवारा केंद्रात करण्यात आली आहे. ही कामगिरी जुन्नर वनविभागाचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते, सहाय्यक वनसंरक्षक स्मिता राजहंस, सहायक वनसंरक्षक अमृत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोसले, वनपाल भानुदास शिंदे वनरक्षक गणेश डोईफोडे, वनरक्षक शेखर जानगवळी, वनरक्षक संतोष भुतेकर तसेच शिरूर वनपरिक्षेत्र कर्मचारी शरीफ शेख, सुधीर शितोळे, रोहिदास शेंडगे, अमोल पाटोळे, गोविंद शेलार, मनोज चौधरी, सुनील कळसकर, राहुल अवचिते, संदीप गव्हाणे, पिंपरखेड बेस कॅम्प रेस्क्यू टीमचे शुभम शिस्तार, अविनाश सोनवणे, श्रेयस उचाळे, मारुती शितोळे यांच्या पथकाने केली.
दरम्यान शिरूर तालुक्यात पूर्व भागात अजूनही बिबटे मोठ्या प्रमाणावर आहेत. सध्या ऊस तोडी अनेक ठिकाणी सुरू असल्याने बिबटे इतरत्र पळताना दिसतात. त्यामुळे वनविभागाने या भागात अशीच शोधमोहीम सुरू ठेवावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.











