विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
बारामती : लहानपणी नकोशी वाटणारी शाळा नंतर मात्र हवीहवीशी वाटते. म्हणूनच शिक्षण घेतल्यानंतर ती शाळा खूप आवडते.. शालेय दशेत त्या शाळेतील केलेली मस्ती, एकत्रितपणे केलेला अभ्यास, शिक्षकांचा विद्यार्थ्यांवरील वचक, शाळेतील क्रीडा स्पर्धा, शिक्षकांनी दिलेली शिक्षा, स्नेहसंमेलन अशा विविध शाळेतील आठवणींना उजाळा देत शारदाबाई पवार विद्या निकेतन, शारदानगर बारामती येथील माजी विद्यार्थ्यांचा मेळावा पार पडला.
गप्पांच्या ओघात सर्वजण आपण इतके मोठे झालो हे विसरून गेले होते. शारदाबाई पवार विद्यानिकेतन या शाळेच्या २००१ या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांची शाळा तब्बल २३ वर्षांनी भरली. यावेळी या विद्यार्थ्यांनी शाळेतील आठवणींना उजाळा देत, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करीत असताना जीवनात यश मिळवले असले तरी त्यामागे शाळेचे संस्कार आहेत. अशी भावना अनेक माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
शाळेतील वर्गमित्र भेटल्याचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होता.यावेळी या विद्यार्थ्यांकडून शाळेस सरस्वतीची मूर्तीही भेट देण्यात आली. यावेळी शिक्षक चंद्रकांत जराड, संजय निंबाळकर, संदीप सुभेदार, मनीषा धालपे यांच्यासह शिक्षकवर्ग व कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन माजी विद्यार्थी महेश ढवाण, तुषार जाधव, श्रीकांत गवारे, गिरीश तावरे, विजय चौडकर यांनी केले होते.











