विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
ऐन कोरोनाच्या काळात आरोग्य विषयी जनजागृती करण्यासाठी आरोग्य दान या अभियानाअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्राची पायी परिक्रमा केलेले बारामतीचे घनश्याम केळकर सध्या कधीही न थांबणाऱ्या अखंड यात्रेचे नियोजन करीत आहेत. या यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
आफ्रिकेतून जगभर माणूस गेला, तो आपल्या पायाने चालत गेला. त्याच्या कित्येक पिढ्यांच्या पायी यात्रेने त्याला जगभर पोचवले. त्याच धर्तीवर पायी किंवा सायकलच्या आधारे ही यात्रा चालेल. या यात्रेत सहभागी होण्यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. कोणताही व्यक्ती त्याच्या वेळेनुसार या यात्रेत सहभागी होऊ शकतो. ही यात्रा केवळ देशातच नाही तर संपूर्ण जगभर जाईल.
जग आनंदी बनविणे हाच या यात्रेचा हेतू आहे. यासाठी जेथे जाईल तेथील लोकांना उपयोगी पडेल असे काम या यात्रेत सहभागी होणाऱ्या लोकांकडून केले जाईल. यात स्थानिक गरजूंसाठी मदतफेरी, जेष्ठांशी आणि मुलांशी संवाद, उत्तम कार्य केलेल्या स्थानिक व्यक्तींच्या मुलाखती असे उपक्रम राबवले जातील. जेष्ठांच्या अनुभवाचा समाजाला उपयोग करून देणे आणि युवकांना जगाचा अनुभव घडविण्याचे काम ही यात्रा करेल.
अशा या अभिनव उपक्रमाबाबत अधिक माहिती पाहिजे असल्यास घनश्याम केळकर यांना ९८८१०९८१३८ या नंबरवर संपर्क साधावा.











