दौंड, महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील पाटस येथील भीमा सहकारी साखर कारखान्याचे सेवानिवृत्त कर्मचारी असून गेल्या अनेक दिवसांपासून हक्काची देणी मिळावीत यासाठी आक्रोश धरणे आंदोलन सुरू आहे. मात्र त्यांच्या मागण्यांकडे कारखाना प्रशासन जाणीव पूर्वक दुर्लक्ष करीत आहे. संचालक मंडळाने सेवानिवृत्त कामगारांची देणी त्वरित द्यावीत अन्यथा राष्ट्रीय जनता दलाचे कार्यकर्ते या आंदोलनात उरतील अशा इशारा जिल्हाध्यक्ष सावता नवले यांनी दिला आहे.
भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याच्या सेवानिवृत्त कामगारांचे २ आक्टोंबर पासून थकीत देणी मिळावी यासाठी कारखानाच्या प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन करत आहेत. दिड महिना उलटूनही कारखान्याच्या संचालक मंडळाने या आंदोलनाची दखल घेतली नाही, त्यातच काही कामगारांचा मृत्यू ही झाला आहे. असे असताना कारखान्याचे अध्यक्ष आणि संचालक मंडळाने दखल घेतली नाही.
ही अत्यंत खेदाची बाब आहे असे म्हणत या आंदोलनकर्ते सेवानिवृत्ती कामगारांची नुकतीच राष्ट्रीय जनता दलाचे जिल्हाध्यक्ष सावता नवले यांनी भेट देऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी पक्षाने या आंदोलनास पाठिंबा दिला. यावेळी बोलताना नवले यांनी कारखान्याच्या जबाबदार पदाधिकारी व व्यवस्थापनास निवृत्त कामगारांची सर्व देणी व मागण्या मान्य कराव्यात, या संदर्भात निवेदन दिले असून या मागण्या मान्य न झाल्यास या सेवानिवृत्त कामगारांच्या लढ्यात मागण्या पूर्ण होईपर्यंत उतरु आणि खांद्याला खांदा लावून लढू, यावेळी पुढील होणाऱ्या परिणामास कारखाना व्यवस्थापन जबाबदार असेल असा इशारा या निवेदनात नवले यांनी दिला आहे.











