ज्ञानेश्वर रायते, बारामती
पती मूकबधिर.. लग्नानंतर आठ वर्षांनी घटस्फोटाचा अर्ज बारामतीच्या न्यायालयात दाखल झाला आणि खाणाखुणांच्या साक्षीने आपले म्हणणे पटवून देत वकिलांच्या युक्तिवादाच्या सहाय्याने हा घटस्फोटाचा अर्ज मंजूर देखील झाला. बारामती न्यायालयातील ही पहिलीच घटना असावी. या घटस्फोटाच्या निर्णयाने दोन्ही कुटुंबातील मध्यंतरीच्या मतभेदांचा शेवट मात्र गोड झाला..!
रमेश इंदापूर तालुक्यातला तर राणी धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्याची (नावे बदलली आहेत). दोघांचा विवाह सन 2016 मध्ये इंदापूर तालुक्यातल्या एका गावात पार पडला. लग्नानंतर एक अपत्य देखील झाले. पण लहानपणापासूनच मूकबधिर असलेल्या रमेश चे वागणे आता राणीला खटकू लागले. दोघांच्याही घरच्यांनी समजावून सांगितले पण दोघांचे काही जुळेना.. मग वाद न्यायालयापर्यंत पोहोचला..
पण पती मूकबधिर असल्याने हा घटस्फोटाचा खटला कसा चालवायचा? हा प्रश्न निर्माण झाला होता.. पण न्यायालयापुढे महत्त्वाचे मुद्दे मांडून वकिलांनी अत्यंत कौशल्याने युक्तिवाद केला. या घटस्फोटाच्या खटल्यासाठी वकिलांनी मूकबधिर शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांनाच या मूकबधिर पतीचे म्हणणे व सुनावणी दरम्यानच्या संवादासाठी बोलावले होते.
घटना सामान्य वाटेल, परंतु कायद्याच्या चौकटीत मात्र ती असामान्य अशीच आहे. सामान्य सभावाच्या पती-पत्नीचा घटस्फोट मंजूर होताना देखील बरीचशी यातायात करावी लागते, मात्र ज्यामध्ये आपले म्हणणेच मांडता येत नाही, अशा पती किंवा पत्नीच्या बाबतीत निर्णय घेताना अनेकदा अडचणी येतात. त्या पार्श्वभूमीवर बारामतीतील हा घटस्फोटाचा निकाल अनेक अर्थाने महत्त्वाचा ठरला आहे. इंदापुरातील प्रसिद्ध दिवाणी वकील अॅड. अविनाश झणझणे यांनी यामध्ये पती व पत्नी या दोघांच्याही बाजूने युक्तिवाद केला होता. त्यांना त्यांचे सहकारी वकील सौरभ टकले, जुई झणझणे, रचना शिंदे, दिपाली गिरी, स्नेहल काळे यांनी सहकार्य केले.
बारामतीतील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयातील वरिष्ठ स्तर सहदिवाणी न्यायाधीश डॉ. निरंजन वानखेडे यांच्यासमोर हा घटस्फोटाचा अर्ज सुनावणीसाठी आला होता. यामध्ये पती व पत्नी या दोन्हींच्या बाजूने एडवोकेट अविनाश झणझणे यांनी बाजू मांडली. पती मूकबधिर असल्याने या घटस्फोटाच्या अर्जामधील सुनावणीसाठी मूकबधिर शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांची साक्ष घेण्यात आली. हा कौशल्याचा युक्तिवाद महत्त्वाचा ठरला.
सन 2016 मध्ये या दोघांचा विवाह झाला होता. पती रमेशचे शिक्षण सातवीपर्यंत झाले होते आणि रमेश हा मूकबधिर असल्याने त्याला मूकबधीर शाळेत शिकण्यासाठी ठेवण्यात आले होते. त्याचे शिक्षण यात शाळेत झाले होते. ऐकणे व बोलणे या दोन गोष्टी वगळता व्यवहारीक चातुर्य व इतर कामात तरबेज असलेल्या रमेशचे लग्नानंतर काही दिवस सुस्थितीत गेले.
मात्र एक अपत्य झाल्यानंतर पती-पत्नीमध्ये स्वभाव व वैचारिक मतभिन्नता नंतरच्या काळात येऊ लागली आणि दोघांना एकत्र संसार करणे कठीण जाऊ लागले. शेवटी सन 2021 मध्ये पत्नीने धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील आपले माहेर गाठले. दरम्यान यावेळी अनेक बैठका झाल्या, मात्र वैचारिक मतभेद वाढतच गेले. अखेर दोघांच्या कुटुंबीयांची घरगुती बैठक होऊन दोघांचा संमतीने घटस्फोट करण्याची ठरले. या दोघांनीही अविनाश झणझणे यांच्याकडे युक्तीवादाची जबाबदारी दिली. झणझणे यांनी या सुनावणीत क्लिष्टता दूर करण्यासाठी मूकबधिर शाळेतील शिक्षकाची मदत घेतली. कोर्टापुढे सर्व बाबी व्यवस्थित मांडल्या गेल्याने हा घटस्फोट मंजूर झाला.
कोरोना नंतरच्या काळामध्ये घटस्फोटाच्या, पोटगीच्या घटना किंवा संसारातील वाद-विवाद मोठ्या प्रमाणावर वाढलेले दिसतात. प्रत्येक न्यायालयामध्ये अनेक प्रकरणे नेहमीच दाखल होत आहेत. या सगळ्या प्रकरणांमध्ये जरी दोघांची परस्पर संमती असेल तरीदेखील बराचसा कालावधी जातो. त्यात जोडीदारांपैकी एक जण विशेष असेल, तर मग ते कसे समजून घेणार? तो खटला कसा चालणार? असे अनेक प्रश्न निर्माण होतात. मात्र बारामती मध्ये मूकबधीर पतीचा घटस्फोटाचा अर्ज मंजूर झाल्याने अशा प्रकारचे पूर्वीचे प्रश्न निकाली निघाले आहेत.











