भोर : महान्यूज लाईव्ह
पुणे जिल्ह्यातील खेड शिवापूरच्या टोलनाक्याजवळ काल संध्याकाळी एक इनोवा क्रिस्टा गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली. या गाडीमध्ये पाच कोटी रुपये आढळून आले आहेत. ही गाडी सांगोला तालुक्यातील असल्याने व अमोल नलावडे या कार्यकर्त्याच्या नावावरील ही गाडी असल्याने त्याचा संबंध सांगोल्याच्या आमदारांशी जोडण्यात आला होता.
मात्र शहाजी बापूंनी हे फेटाळले असून दुसरीकडे ज्यांच्या नावावर तांत्रिकदृष्ट्या गाडी दिसते आहे, ते मालक अमोल नलावडे यांनी देखील आपल्या संबंध नाही, ही गाडी आपण सहा महिन्यापूर्वीच विकली असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता या पाच कोटीचा मालक कोण? हा प्रश्न निर्माण झाला आहे.
काल संध्याकाळी खेड शिवापूरच्या टोलनाक्यावर ही गाडी सापडल्यानंतर रात्रभर या संदर्भात वेगवेगळी चर्चा सुरू आहे, दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील थेट आमदार शहाजी पाटील यांना लक्ष्य करत ट्विट केले. मात्र आज सकाळी शहाजी पाटील यांनी या संबंधातील वृत्त फेटाळले. या कोणत्याही गोष्टीशी आपला संबंध नाही, अमोल नलावडे हे शेकाप पक्षाचे पदाधिकारी आहेत. काही महिन्यांपूर्वीच ते शिवसेनेत आले आहेत, असे त्यांनी सांगत त्यांचे अनेक उद्योग आहेत, त्यामुळे पूर्ण माहिती घेतल्याशिवाय मला सांगता येणार नाही असे पाटील म्हणाले.
सोमवारी रात्री सापडलेल्या या रकमेसंदर्भात अमोल नलावडे यांनी आपण ही गाडी पाच महिन्यापूर्वीच बाळासाहेब आसबे नावाच्या व्यक्तीला विकली. त्यामुळे या प्रकरणाचा माझा काही संबंध नाही. या व्यवहाराचे ऑनलाईन पैसे मला केव्हाच मिळालेले आहेत. गाडी तांत्रिकदृष्ट्या माझ्या नावावर असेल, परंतू माझा काही संबंध नाही. मला कोणीही पोलिसांनी फोन केलेला नाही, परंतु मला काही अडचण येण्याची शक्यता नाही, काही वर्षांपर्यंत मी शेकापचे काम करत होतो, मात्र आता आम्ही कोणत्याही पक्षात नाही असे अमोल नलावडे यांनी सांगितले.
आता खरोखरच ही गाडी कोणाची? हे पैसे कोणाचे? आणि नक्की पैसे किती? यावरून बरीच चर्चा सुरू आहे, कारण संजय राऊत 15 कोटी सांगतात तर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पाच कोटी होती असे सांगितले जाते, मात्र नोटाबंदीच्या नंतर दोन लाखापेक्षा अधिक रक्कम रोख स्थलांतरित, हस्तांतरित अथवा घरात ठेवता येत नसेल तर एवढी रक्कम नेमकी कोणाकडे निघाली होती? हे तपासण्याचे आव्हान पोलिसांपुढे असणार आहे











