सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या संसदीय मंडळामध्ये (पार्लमेंटरी बोर्ड) माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची काल (दि.१८) नियुक्ती करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या मान्यतेने नियुक्ती करण्यात येत आहे, असे पक्षाचे सरचिटणीस रवींद्र पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांना काल (शुक्रवार) पत्राद्वारे कळविले.
त्यानंतर पक्षाची संसदीय मंडळाची बैठक मुंबईत शनिवारी (दि.१९) झाली. यावेळी हर्षवर्धन पाटील थेट शरद पवारांच्या शेजारी बसलेले पाहायला मिळाले. भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर हर्षवर्धन पाटलांचा वीस वर्षाचा अनुभव लक्षात घेत भाजपने त्यांच्या संसदीय कामाची राज्याच्या राजकीय कारभारात दखल घेणे अपेक्षित होते मात्र दुसरीकडे शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केल्यानंतर दोन दिवसातच हर्षवर्धन पाटलांना मिळालेला सन्मान त्यांच्या कार्यकर्त्यांना सुखावून गेला.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रियाताई सुळे, डॉ. अमोल कोल्हे यांच्यासह माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत सहभाग घेतला.











