राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
दौंड : दौंड तालुक्यातील पाटस ग्रामपंचायत हद्दीत होत असलेल्या स्टेरीबायो लाईफ सायन्सेस प्रा.लि. या कंपनीला ग्रामपंचायत प्रशासनाने दिलेला ना हरकत प्रमाणपत्र रद्द करण्याचा ठराव ग्रामसभेत मंजूर होऊनही तो अद्याप रद्द करण्यात आला नाही. ग्रामपंचायत प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या पाटस हद्दीत सध्या औद्योगिक कंपन्या होऊ येऊ लागल्या आहेत. पाटस आणि कानगावच्या हद्दीत असलेल्या श्री सिमेंट कंपनी ही त्यातलीच एक वादग्रस्त कंपनी ठरली आहे. या कंपनीला ग्रामपंचायत प्रशासनाने परस्पर ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक कागदपत्रे दिलेल्या ग्रामसभेत प्रचंड वादळ निर्माण होऊन मोठा वाद झाला होता. हे प्रकरण न्यायालयात गेले.
हे प्रकरण ताजे असतानाच आता ग्रामपंचायतीने दुसरा एक पराक्रम केला आहे. पाटस टोल नाक्याजवळ नव्याने होत असलेल्या स्टेरीबायो लाईफ सायन्सेस प्रा. लि. या कंपनीला १६ डिसेंबर २०२२ रोजी तत्कालीन सरपंच अवंतिका शितोळे आणि ग्राम विकास अधिकारी संदीप लांडगे यांच्या स्वाक्षरीने ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने हा ठराव ग्रामसभेत न घेता मासिक सभेत घेऊन हे प्रमाणपत्र दिले आहे.
प्रमाणपत्रावर तत्कालीन सरपंच अवंतिका शितोळे व ग्राम विकास अधिकारी संदीप लांडगे यांच्या स्वाक्षरी आहेत. ग्रामस्थांना विचारात न घेता व विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने कंपन्यांना आवश्यक कागदपत्रे देण्याचा सपाटा लावला आहे. औद्योगिक कारणासाठी कंपन्यांना ना हरकत प्रमाणपत्र किंवा आवश्यक कागदपत्र घेण्यापूर्वी ते ग्रामसभेत त्याच्यासाठी ठेवून ग्रामसभेचा ठराव बहुमताने मंजूर करणे अपेक्षित आहे. मात्र तसे न करता कोणालाही कळू न देता परस्पर कंपन्यांना आवश्यक कागदपत्रे दिली जात असल्याचे उघड झाले आहे.
स्टेरीबायो लाईफ सायन्सेस प्रा.लि. या कंपनीला मासिक मीटिंगमधील ना हरकत प्रमाणपत्र दिलेला ठराव हा मासिक मीटिंगमध्येच रद्द करावा असा ठराव ग्रामसभेत मंजूर करण्यात आला. असे असतानाही ग्रामपंचायतच्या नुकत्याच पार पडलेल्या मासिक बैठकीत या कंपनीच्या संदर्भातील ठराव चर्चेसाठी ही घेण्यात आला नाही. जाणीवपूर्वक संबंधित कंपनीला पाठीशी घालण्याचा प्रकार ग्रामपंचायत प्रशासन करीत आहे.
संबंधित कंपनीला ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक कागदपत्र देण्यासाठी काही सदस्यांनी आर्थिक तडजोड केली का ? अशी शंका आता ग्रामस्थ उपस्थित करीत आहे. सदर कंपनी कोणते उत्पादन काढणार आहे, कंपनीतून निघणाऱ्या दूषित सांडपाण्याची कशी विल्हेवाट लावणार आहे? जल आणि हवेतील प्रदूषणामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण होणार आहे. या संदर्भात कोणतीही माहिती संबंधित कंपनीने ग्रामपंचायत प्रशासनाला दिली नाही.
नियम धाब्यावर ठेवून आणि काही ठराविक गाव पुढाऱ्यांना हाताशी धरून संबंधित कंपनीचे काम सुरू आहे. पाटस परिसरातील या कंपन्या ग्रामस्थांच्या आरोग्याशी आणि जीवाशी खेळत असल्याने त्या वादग्रस्त बनत चालल्या आहेत. पाटस टोल नाक्याजवळ होणारी कंपनी ही ग्रामस्थांच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे, ती इतर ठिकाणी स्थलांतरित करण्यात यावी अशी मागणी आता ग्रामस्थ करू लागले आहेत.
दरम्यान या संदर्भात ग्रामपंचायतीच्या सरपंच तृप्ती भंडलकर यांना विचारले असता, स्टेरीबायो लाईफ सायन्सेस प्रा.लि. या कंपनीला दिलेल्या ना हरकत प्रमाणपत्र हे मासिक सभेतच रद्द करण्याचा ठराव ग्रामसभेत झाला आहे. हा विषय पुढील होणाऱ्या मासिक सभेत चर्चेसाठी घेऊन संबंधित कंपनीला दिलेले ना हरकत प्रमाणपत्र रद्द करण्याचा ठराव करण्यात येईल.











