भिगवण : महान्यूज लाईव्ह
डेंग्यूने आजारी असलेल्या पत्नीचा आजार दिवसेंदिवस बळावत गेला उपचाराला प्रतिसाद न मिळाल्याने पत्नीचा दोन दिवसापूर्वी मृत्यू झाला या घटनेचा विरह सहन न झाल्याने दोन दिवस शोकाकुलात बुडालेला पती अखेर एकटाच घरात गेला आणि त्याने गळफास घेऊन जीवन संपवले मात्र या साऱ्या धकाधकीत 7 महिन्याची चिमुकली पोरगी मात्र पोरकी झाली…
इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील ही घटना. आज संपूर्ण भिगवणकरांना शोकसागरात घेऊन गेली. श्रावणी स्वप्निल सुतार या 22 वर्षीय विवाहित महिलेची दोन दिवसापूर्वीच डेंग्यूशी सुरू असलेली जगण्याची लढाई संपली. शुक्रवारी तारीख 27 रोजी श्रावणी यांचे निधन झाले. श्रावणी यांना अवघ्या 7 महिन्याची चिमुकली मुलगी आहे. या घटनेने सुतार कुटुंबीय प्रचंड दुःखात होते.
पत्नीवर जीवापाड प्रेम असलेल्या गोपाळ उर्फ स्वप्निल प्रदीप सुतार या 24 वर्षीय युवकाने घरातील छताच्या लोखंडी अँगल ला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. दोन दिवसापूर्वी पत्नीचा आजार आणि मृत्यू झाला. पत्नीच्या मृत्यूने प्रचंड नैराश्य आल्याने स्वप्नील यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.
दोन दिवस प्रचंड दुःखात असल्याने स्वप्नील हे कोणाशी फारसे बोलत नव्हते. आज सकाळी मी जरा थकलोय, आराम करतो असे म्हणून ते स्वतःच्या खोलीत गेले आणि बाहेर आलेच नाहीत. बराच वेळ बाहेर आले नाहीत, म्हणून घरच्यांनी हाका मारल्या पण प्रतिसाद मिळाला नाही म्हणून खिडकीतून डोकावून पाहिल्यानंतर स्वप्निल यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले.
त्यांना तातडीने भिगवण च्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांचे चुलत भाऊ संतोष सुतार यांनी भिगवण पोलिसांना खबर दिली. भिगवणमध्ये मोबाईल शॉपी चालवणारे स्वप्निल सुतार हे मित्रांमध्ये त्यांच्या स्वभावामुळे परिचित होते. मात्र या घटनेने संपूर्ण भिगवणलाच धक्का बसला.











