पुणे : महान्यूज लाईव्ह
वैभव लबडे आणि अमोल माने हे हडपसर मधील. दोघे जवळचे दोस्त. अमोल स्वयंपाकाचे काम करायचा, तर वैभव टेम्पो चालक. दोघेही दारू प्यायचे. दोघांनाही दारू पिण्याचे व्यसन होते. एकमेकांचे मित्र असले तरी, अमोल मात्र वैभव हा जास्त दारू पितो असे सांगत त्याच्या आई आणि पत्नीला माहिती द्यायचा.
त्याच्यातून वैभवच्या घरी भांडण व्हायचे. बरोबरच दारू पितो आणि तरीही घरी सांगतो, म्हणून वैभवच्या मनात अमोल बद्दल राग निर्माण झाला आणि वैभव आणि त्याचा मित्र ज्ञानेश्वर सकट या दोघांनी मिळून अमोलला मारायचे ठरवले.
परवा केटरिंगचे काम करण्यासाठी बाहेर गेलेला अमोल माने फोन उचलेना. बराच वेळा त्याला फोन केला. परंतु तो फोन उचलत नव्हता, म्हणून त्याच्या बहिणीने त्यांच्या ओळखीच्या एका व्यक्तीला 19 सप्टेंबर रोजी रात्री अमोल मानेच्या घरी पाठवले, तर अमोल माने हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्यांनी लागलीच त्याच्या बहिणीला व पोलिसांना कळवले. त्यावरून पोलिसांनी अमोल मानेच्या घरी तातडीने भेट दिली.
खुनाची घटना असल्याने पोलिसांनी तातडीने परिसरातील सीसीटीव्ही तपासण्यास सुरुवात केली. त्यातील तांत्रिक माहितीच्या आधारे वैभव लबडे याच्यावर पोलिसाची संशयाची सुई वळाली. पोलिसांनी वैभव लबडे ला शोधण्यास सुरुवात केली.
वैभव लबडे ला पोलिसांनी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथून ताब्यात घेतले. लागलीच त्याच्याकडे चौकशी केली असता, ज्ञानेश्वर सकट याचेही नाव पुढे आले. वैभव व ज्ञानेश्वर या दोघांनी मिळून अमोल माने याचा लोखंडी रॉड डोक्यात घालून खून केल्याचे निष्पन्न झाले.











