नाशिक : महान्यूज लाईव्ह
बारामती तालुक्यातील काटेवाडीचा सुपुत्र आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू उत्कर्ष काळे याला प्रथम श्रेणी किंवा क्लासवन अधिकारी पदाची पोस्ट देण्याऐवजी महाराष्ट्र शासनाने पोलीस शिपाई पद देऊ केले, यावरून कालच सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारवर टीकास्त्र सोडले होते. या निर्णयामुळे महायुती सरकार बॅकफुटवर आले असतानाच आता राष्ट्रीय खेळाडू कविता राऊत हिने थेट सुप्रिया सुळे यांच्यावरच टीका केली आहे. मात्र या टीकेमुळे कविता राऊत यांच्यावरही अन्याय झाल्याचे समोर आले आहे.
सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारमधील गोंधळ उघड केला असताना, आता सुप्रिया सुळे यांना टार्गेट करत कविता राऊत हिने नव्याने एक पोस्ट केली व त्यामध्ये सुप्रिया सुळे यांना उत्कर्ष काळे दिसले, परंतु आदिवासी भागातील खेळाडू का दिसले नाहीत? असा सवाल केला आहे.
कविता राऊत हिने बारामतीकरांना कधी उत्तर महाराष्ट्रातले आदिवासी खेळाडू दिसले नाहीत, त्यांच्या बाजूने कधी असे ट्विट केले गेले नाही. उत्कर्ष काळे मात्र महाराष्ट्राचा खेळाडू दिसतोय. त्याला शब्द दिला जातो आणि आम्हाला मात्र वेगळा निकष लावला जातो असे नमूद करत आपले मत कळवा असेही कविता राऊत हिने लिहिले आहे.
उत्कर्ष काळे यास राज्य सरकारने उपविभागी पोलीस अधिकारी किंवा अशाच समक्ष पदावर नेमणूक करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र ते आश्वासन पाळले नाही, तर दुसरीकडे कविता राऊत यांना राज्य सरकारमध्ये उपजिल्हाधिकारी पदावर नोकरीची अपेक्षा असताना, त्यांना मात्र क्रीडा प्रशिक्षक पदावर नियुक्त केल्याने त्यांनी न्यायालयात जाण्याचा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील बहुतांश खेळाडूंची राज्य सरकारने गोची केले आहे असेच यातून दिसून येत आहे.











