मुंबई : महान्यूज लाईव्ह
घटना मुंबईतील, पण आंध्र प्रदेश सरकारशी संबंधित! आंध्रप्रदेश मधील वायएसआर काँग्रेसचे नेते कुकाला विद्यासागर याच्याविरोधात एका अभिनेत्रीने मुंबईत येऊन लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल केली होती. ही तक्रार मागे घेण्यासाठी नेत्याच्या सुपारीबाज आयपीएस अधिकाऱ्यांनी या अभिनेत्रीलाच खोट्या गुन्ह्यात अडकवून तिच्या कुटुंबीयांना देखील यामध्ये गोवलं आणि तब्बल दीड महिना तुरुंगात ठेवलं. पण हे प्रकरण या अधिकाऱ्यांना आता भोवलं आहे.
या अभिनेत्रीने मुंबईत येऊन लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल केली होती. ती मागे घेण्यासाठी पोलीस अधिकारीच दबाव टाकत होते. पण अभिनेत्रीने त्यांचे ऐकले नाही म्हणून एक प्रकरण खोट्या पद्धतीने तयार करून तिला आंध्र प्रदेश मध्ये खोट्या गुन्ह्यात अडकवले. तिचा सुमारे दीड महिना शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला. तिला आणि तिच्या आई-वडिलांना दोन फेब्रुवारी रोजी अटक झाली. तब्बल 45 दिवसानंतर ती सुटका झाली.
पीएसआर अंजा नेेलु, कांती राणा टाटा आणि विशाल गुन्नी अशी या तीन वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची नावे असून आंध्र प्रदेश सरकारने त्यांना निलंबित करण्यात आले आहे. या तिघांनीही आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. या पोलिसांनी अटकेत असताना अभिनेत्री व तिच्या कुटुंबीयांना कायदेशीर अधिकारापासून वंचित ठेवले व शारीरिक आणि मानसिक छळ केला तसेच देशाच्या इतर भागातही असे गुन्हे दाखल करू अशी धमकी दिली.











