बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे यांना शिक्षक दिनानिमित्त दिला जाणारा सन २०२४ चा कै. एस एम कुलकर्णी उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे.
हिंद सेवा मंडळाचे शताब्दी वर्ष व पेमराज सारडा महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य कै. एस एम कुलकर्णी यांच्याही जन्मशताब्दी वर्षानिमित्त (२०२३ पासून) त्यांच्या स्मरणार्थ सन २०२४ यावर्षी च्या उत्कृष्ठ प्राचार्य पुरस्कारासाठी हिंद सेवा मंडळाचे पेमराज सारडा महाविद्यालय व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे गठित करण्यात आलेल्या निवडसमितीने एकमताने डाॅ. भरत शिंदे यांच्या नावाची शिफारस केली आहे.
हा पुरस्कार दि. ५ सप्टेंबर रोजी विद्यापीठाच्या मा. कुलगुरूंच्या हस्ते प्रदान करण्यात येणार असून त्याचे स्वरूप २५ हजार रुपये, स्मृति चिन्ह व प्रमाणपत्र असे आहे. प्राचार्य डॉ. शिंदे यांना हा पुरस्कार जाहीर होताच विद्या प्रतिष्ठान संस्थेचे उपाध्यक्ष अँड अशोक प्रभुणे व सचिव अँड नीलिमा गुजर रजिस्ट्रार श्रीश कंबोज, विश्वस्त सौ सुनेत्रा पवार, खजिनदार युगेंद्र पवार, डॉ राजीव शहा, उपप्राचार्य डॉ शामराव घाडगे व डॉ लालासाहेब काशिद नीलिमा पेंढारकर व सहकारी शिक्षक, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन केले.
प्राचार्य डॉ. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयास उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार मिळाला असून विद्यादीप या नियतकालिकासही सलग चार वर्षे प्रथम पारितोषिक मिळत आहे. या महाविद्यालयास देशातील स्वच्छ महाविद्यालय पुरस्कार मिळाला असून प्राचार्य डॉ. शिंदे यांनी २०१७ साली सुरू केलेल्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व २०२१ साली सुरू केलेल्या करिअर कट्टा या उपक्रमाअंतर्गत पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रातून जवळपास ३५० हून अधिक विद्यार्थी राज्य सेवा परीक्षा पास झाले असून बहुतांश पोलिस अधिकारी झालेले आहेत.
प्लेसमेंट सेलकडूनही महाविद्यालयातील जवळपास ८०० हून अधिक विद्यार्थी विविध कंपन्यांमध्ये नोकरी मिळविण्यात यशस्वी झाले आहेत. या महाविद्यालयाचे विद्यार्थी शैक्षणिक, कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर राहून त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी डॉ. भरत शिंदे प्रयत्नशील असतात. विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या गुणवत्ता वाढीसाठीही त्यांनी दिलेल्या योगदानाचाही हा पुरस्कार देताना विचार करण्यात आला आहे.
शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी त्यांनी केलेले विशेष प्रयत्न, संशोधन तसेच नवकल्पना यांचा सुरेख संगम साधून त्यांनी महाविद्यालयाच्या नावलौकिकात भर घातली आहे. डॉ. शिंदे यांचे १०० हून अधिक शोधनिबंध व ३० क्रमित पुस्तके व संदर्भग्रंथ प्रकाशित झालेले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून वनस्पतीशास्त्र विषयात १४ विद्यार्थ्यांनी पी.एच.डी. पदवी संपन्न केलेली आहे.











