विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
बारामतीतील तांदूळवाडी येथील आकाश पगारे व भूषण पगारे हे दोघे भाऊ दरवर्षी 22 जुलै आला, की आपली सारे कामे बाजूला ठेवून तांदूळवाडी येथील बोरावके जेष्ठ नागरिक निवास गाठतात. ज्येष्ठांची मोफत दाढी आणि कटिंग करतात.
22 जुलै हा दिवस उपमुख्यमंत्री अजित पवारांचा वाढदिवस. अजित पवारांचा पगारे बंधूंवर मोठा प्रभाव. आपल्या लाडक्या नेत्याच्या वाढदिवशी नेमके काय करायचे? असा प्रश्न पाच वर्षांपूर्वी त्यांना पडला. आपण जो उपक्रम करू तो आगळावेगळा तर असला पाहिजे, परंतु तो समाजाच्या उपयोगी पडला पाहिजे अशी त्यांची भावना होती.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वीय सहाय्यक सुनीलकुमार मुसळे यांच्याशी चर्चा केली. काही सहकाऱ्यांशी चर्चा केली. काही राजकीय पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि हा उपक्रम सुरू झाला. दोन गरजवंतांमधील हा एक वेगळा दुवा देखील ठरला. कारण बोरावके जेष्ठ नागरिक निवासामध्ये असलेल्या जेष्ठ नागरिकांना जी गरज होती, ती यानिमित्ताने पूर्ण झाली.
गेल्या पाच वर्षापासून आकाश व भूषण हे त्यांच्या ए बी सलून या दुकानामार्फत हा उपक्रम राबवतात. 22 जुलै या दिवशी ते ज्येष्ठ नागरिक निवासात येऊन तेथील ज्येष्ठांशी संवाद साधतात व ज्येष्ठांची दाढी कटिंग मोफत करून देतात. खरंतर हा त्यांच्या व्यवसायाशी निगडित विषय असला, तरी देखील दिवसभराची सेवा या ज्येष्ठांच्या आरोग्यासाठी करून ते उपमुख्यमंत्री अजित पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात.
यावर्षी उपमुख्यमंत्री अजित पवारांचे चिरंजीव जय पवार यांनी देखील या उपक्रमाची दखल घेतली आणि या दोन्ही भावांचे कौतुक केले. यावेळी या दोन्ही भावांनी जेष्ठ नागरिकांना केसांची स्वच्छता व डोक्यातील केसांना आजार होऊ नये म्हणून नेमकी काय काळजी घ्यावी याविषयी महत्त्वाच्या टिप्स दिल्या. यावेळी जय पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष जय पाटील, किरण कारंडे, बोरावके जेष्ठ नागरिक निवासाचे सचिव किशोर मेहता, खजिनदार फक्रूशेठ बोहरी, सहखजिनदार अमित बोरावके, विश्वस्त डॉ. अजिंक्यराजे निंबाळकर, सुरेंद्र भोईटे, व्यवस्थापक किरण शेळके आदी उपस्थित होते.











