छत्रपती संभाजीनगर : महान्यूज लाईव्ह
दोन दिवसांपूर्वी अमित शहा यांनी पुण्यात भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात शरद पवारांवर खरपूस टीका केली होती. भ्रष्टाचारांचे सरदार शरद पवार असल्याची टीका केली होती. यावरून राज्यात बरच राजकीय रणकंदन माजलं. त्यावर आज शरद पवारांनी एक वेगळेच वक्तव्य केलंय.
अमित शहांनी शरद पवार यांच्यावर टीका केल्यानंतर शरद पवार यांनी देशाचा गृहमंत्री तडीपार असल्याची टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमित शहा यांच्यावर टीका करणे म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखे आहे असे वक्तव्य केले होते.
त्यावर छत्रपती संभाजीनगर येथील दौऱ्यात पत्रकारांनी शरद पवार यांना विचारले असता, शरद पवारांनी एका वाक्यात विषय संपवला. शरद पवार हसले आणि म्हणाले, आम्ही तो दिवा महाराष्ट्राच्या जेलमध्ये पाहिला आहे. या एका वाक्यातच त्यांनी अमित शहा यांच्यावरील टीकेला उत्तर दिले.
दरम्यान केंद्रातील सरकार संदर्भात शरद पवार यांना विचारले असता, शरद पवार यांनी सांगितले की, केंद्रातील सरकार पडेल की नाही ही माहीत नाही. जोपर्यंत नितीश कुमार आणि चंद्राबाबु नायडू जोवर मोदींसोबत आहेत, तोपर्यंत सरकारला अडचण नाही. या अगोदर सत्ता एकट्या मोदींच्या हातात होती. आता मात्र या सत्तेमध्ये वाटेकरी आले आहेत.











