महाराष्ट्रातील इतर तालुक्यांचे वेगळे राजकारण असलं तरी बारामतीत मात्र निवडणूक संपली की फक्त समाजकारण असतं. यावेळी मात्र त्याला तडा जाण्याची चिन्हे आहेत. खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात सक्रिय झालेल्या युगेंद्र पवार यांना बारामती तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पदावरून हटवण्यात आल्याची माहिती मिळते आहे.
अद्याप याला दुजोरा मिळाला नसून युगेंद्र पवार यांनीही आपल्याला या संदर्भातील कोणतेही पत्र मिळालेले नसल्याची माहिती आज पत्रकारांना दिली. मात्र या चर्चेने बारामती तालुक्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
युगेंद्र पवार म्हणाले, परवा एका ठिकाणी बैठक झाल्याचे कानावर आले आहे. मात्र माझ्याकडे कोणतेही अधिकृत पत्र आलेले नाही. हे केवळ चर्चा आहे. कोणी कशावरही चर्चा करेल, मात्र प्रत्येक चर्चा खरीच असते असे नाही. गेली तीन-चार वर्षापासून मी कुस्तीगीर संघाची जबाबदारी पार पाडत आहे. या काळात खूप कामे केली दादांनी देखील मदत केलेली आहे. .
दरम्यान सुप्रिया सुळे यांच्या बाजूने काम केल्याची ही पोचपावती आहे का? असा प्रश्न पत्रकारांनी केला तेव्हा युगेंद्र पवार म्हणाले, तुम्ही याबाबत जो अर्थ लावायचा तो लावू शकता. मात्र माझ्याकडे कुठलीही अधिकृत माहिती आलेली नाही. यासंदर्भात जर काही पत्र व्यवहार यावर झाला, तर ज्येष्ठ नेते शरद पवारांची ही भेट मी या संदर्भात घेईल.











