दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यात यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीत पुणे सोलापूर महामार्गावर रात्री चौफुला ते सहजपुर दरम्यान वेगवेगळ्या तीन अपघात झाले आहेत. या अपघातात एकूण आठ जणांचा मृत्यू झाला. तर चारजण गंभीर जखमी झाले आहेत.
पुणे सोलापुर महामार्गावर वाखारी (ता. दौंड) येथे महामार्गावरून पायी चालणाऱ्या एका व्यक्तीस अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला.
कासुर्डी (ता. दौंड) येथील शेरू ढाबा नजीक एक कंटेनर वाहनचालक वाहन रस्त्यावर उभी करून लघुशंकेसाठी थांबला. त्या वाहनाला एका कारने पाठीमागून मागून जोरदार धडक दिली. या अपघातात या कारमधील सर्व पाच व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला.
तिसरा अपघात हा सहजपूर (ता. दौंड) गावच्या हद्दीत झाला. रस्त्यावर मोठा खड्डा पडला असून या खड्यात गॅस वाहतुक कंटेनरचे पुढील बाजूचे चाक आदळण्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटून वाहन महामार्गावरील दुभाजक ओलांडून विरूद्ध दिशेकडील मार्गावर जावून समोरून येणारा दोन वाहनाला जावून धडकला या अपघातात एकाचा जागीच तर एकाचा रूग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
मध्यरात्रीच्या सुमारास पुणे सोलापूर महामार्गावर व यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीत हे तिन्ही अपघात झाले. दरम्यान या अपघातांची माहिती मिळताच यवत पोलीस स्टेशनचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलीस पुढील तपास करीत आहेत.











