दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई तालुक्यातील मोसमी पावसापूर्वी करावयाची विविध कामे तसेच येऊ शकणाऱ्या संभाव्य समस्या यांचा आढावा शासकीय अधिकाऱ्यांकडून नुकताच घेण्यात आला.
तहसीलदार सोनाली मिटकरी यांच्या अध्यक्षतेखाली वाई पंचायत समितीच्या किसनवीर सभागृहात ही बैठक झाली या बैठकीस नायब तहसीलदार वैशाली जायगुडे भाऊसाहेब जगदाळे सहाय्यक गटविकास अधिकारी शांताराम गोळे यांच्यासह विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत तहसीलदार मेटकरी यांनी विविध कार्यालय प्रमुखांनी तयार केलेल्या नियोजनाची माहिती घेतली. शासकीय कार्यालयांनी केलेले नियोजन अतिशय योग्य आहे परंतु ते प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी यंत्रणाही सावध व दक्ष असली पाहिजे असे मत मेटकरी यांनी व्यक्त केले.
पावसाळ्यापूर्वी गावोगावच्या पाणी नमुन्यांची तपासणी करावी गावातील गरोदर मातांचे सर्वेक्षण ग्रामपंचायत स्तरावर अंगणवाडी सेविका आणि आशा सेविकांच्या मार्फत करून नैसर्गिक आपत्ती कालावधीत प्रथमोपचार व्यवस्थित मिळेल याची दक्षता घ्यावी. संभाव्य आपत्तीग्रस्त गावांसाठी औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध असेल याची दक्षता घ्यावी, तशा स्वरूपाचा आराखडा करावा. धोम बलकवडी धरणाच्या कार्यकारी अभियंतांनी धरणावरील सर्व यंत्रणा तांत्रिकदृष्ट्या दुरुस्त करून घ्यावी अशी सूचना त्यांनी केली.
सार्वजनिक बांधकाम विभागाने देखील रस्ता दुरुस्तीचे काम पूर्ण करावे व पुलाखालील अडकलेला कचरा काढून पूल मोकळे करावेत. महावितरणने देखील पावसाळ्यापूर्वी सर्व उपकेंद्रावरील विद्युत रोहित्रांची तपासणी करावी. वाई शहराच्या नदीपात्राकडेची व धोकादायक घरे वाढे आणि इमारती यांना पावसाळ्यापूर्वी नोटीसा द्याव्यात अशी देखील सूचना त्यांनी केली.











