राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
दौंड : जमिनीच्या व्यवहारात नऊ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी यवत आणि पाटस पोलिसांनी पुण्यातून इंस्टाग्राम रील स्टार विश्वनाथ देसाई याला अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली सविस्तर माहिती अशी की, उरुळी कांचन येथील अनिल लक्ष्मण कांचन यांना जमिनीच्या व्यवहारासाठी १ कोटी रूपये रक्कमेची गरज असल्याने १ कोटी रूपये २ टक्के व्याजाने देतो त्यापोटी तारण म्हणून हवेली तालुक्यातील शिंदवणे येथील दिड एकर क्षेत्र साठेखत करून दयावे लागेल, असे म्हणून विश्वास संपादन केला.
सदर साठेखतासाठी लागणारा ६ लाख रूपये खर्च आर. टी. जी. एस व रोख रकमेव्दारे स्विकारून कांचन यांची संशयित आरोपी विश्वनाथ देसाई व माया विश्वनाथ देसाई (दोघे रा. पिंपरी चिंचवड पुणे ) यांनी फसवणुक केली, तसेच कांचन यांचे नातेवाईक दौंड तालुक्यातील यवत येथील किरण यादव यांची देखील ९ लाख रूपये रोख स्वरूपात घेवुन फसवणूक केली होती.
याबाबत यादव यांनी यवत पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने विश्वनाथ देसाई व माया विश्वनाथ देसाई यांच्या विरूध्द यवत पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक सलीम शेख हे करीत होते. दरम्यान या गुन्ह्यातील मुख्य संशयित आरोपी विश्वनाथ देसाई व माया देसाई हे दोघेही गुन्हा दाखल झाल्यानंतर इन्स्टाग्रामवर सोन्याचे दागिने घालून व्हिडिओ बनवत होते.
त्यांनी हे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले होते. गुन्हा दाखल झाल्यानतर इन्स्टाग्रामवर विश्वनाथ देसाई याने रात्रीच्या वेळी पोलीस गस्त करणाऱ्या गाडीच्या समोर उभा राहून त्या व्हिडिओमध्ये पुण्यात दिसेल, तिथे अटक करा असे रीलचे गाणे बनवून पोस्ट टाकली व जणू यवत पोलीसांनाच आव्हान दिले. मग मात्र यवत पोलीसांनी कमाल केली. ठाण्याचे तपासी अधिकारी सलीम शेख यांनी या आरोपीला पुण्यात जाऊन नुकतीच अटक केली.











