संदीप मापारी पाटील, बुलढाणा
जगप्रसिद्ध लोणार हे उल्कापातामुळे सगळ्यांनाच माहित आहे, पण लावणासूर राक्षसाच्या नावावरून पडलेलं लोणार नावाचे गाव जगभरात दैत्यसूदन मंदिरामुळे ही चांगलेच परिचित आहे गेल्या काही दिवसांपूर्वीच देशात अयोध्येतील राम मंदिरा मधील राममूर्तीवर सूर्यकिरणांचा अभिषेक घडण्याची कल्पना प्रत्यक्षात साकारलेली आपण सर्वांनी पाहिली त्याची खूप चर्चा देखील झाली पण लोणारच्या या दैत्य सुधार मंदिरामध्ये देखील मूर्तीवर सूर्यकिरणांचा अभिषेक मे महिन्यात होतो आता देखील तो 14 मे पासून 19 मे पर्यंत सुरू राहणार आहे हा किरणोत्सव पाहण्यासाठी येथे गर्दी होत आहे.
क्रॉप पेपरला घड्या घालून जसे दिसते, तशा स्वरूपाचे दगडाला घड्या घालून तयार झालेले हे दैत्यसुदन मंदिर लोणार मधील एक अद्भुत अशी शिल्पकला आहे. दैत्यसूदन मंदिर हे नवव्या शतकातील चालुक्यकालीन दक्षिणात्यशैलीतील आणि पश्चिम विदर्भातील सर्वात सुंदर मंदिर म्हणून ओळखले जाते. कोणार्कचे सूर्य मंदिर आणि खजुराहो मंदिर या दोन मंदिराच्या स्थापत्यशैलीच्या आधारावरती या मंदिराची रचना असून भगवान विष्णूंना समर्पित केलेल्या या मंदिरात भगवान विष्णूंची मूर्ती आहे.
या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे वास्तुशास्त्र आणि खगोलशास्त्राची सांगड घालून या मंदिराची रचना करण्यात आली आहे. त्यामुळे दरवर्षी या मंदिरावर सूर्यकिरणोत्सव होतो. हा किरणोत्सव जवळपास पाच दिवस चालतो आणि दररोज फक्त दहा मिनिटांचा असतो. तो पाहण्यासाठी मंदिरामध्ये गर्दी होते. सध्या या मंदिराचे शिखर पूर्णपणे पडलेले आहे. येथील मुख्य मूर्ती ही अलीकडची असावी.
मंदिराला बाहेरून इतके कोरीव काम आहे की, एक एक पॅनेल निरखून बघायला पूर्ण दिवस लागू शकतो. या मंदिराच्या सगळ्याच बाजूने अतिक्रमण झाले असल्याने आता तिथला रस्ता अरुंद झाला आहे. बरेच लोक फक्त सरोवर बघून आणि लोणार धार येथील मंदिर बघून निघून जातात, पण सरोवराच्या खाली ठीकठिकाणी शेकडो वर्षांपासूनची जुनी मंदिर आहेत. त्यापैकीच एक आहे हे दैत्यसूदन मंदिर!











