इंदापूर : महान्यूज लाईव्ह
इंदापूरचे म्हसोबावाडीचे पोलीस पाटील आणि ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य एड. तुषार झेंडे पाटील हे सातत्याने राज्यभरातील विविध घटनांवरून न्यायिक मागणीसाठी पाठपुरावा करत असतात आणि त्याला यशही मिळते. सन 2021 मध्ये गोंदियाच्या खामगाव पोलीस ठाण्यात आरोपीचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला.
या प्रकरणी त्यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे पाठपुरावा केला आणि तीन वर्षानंतर आयोगाने त्याची दखल घेत साडेसात लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा आदेश केला. आमगाव पोलीस ठाण्यात राजकुमार अभय कुमार याचा पोलीस कोठडी दरम्यान मृत्यू झाला होता याप्रकरणी तुषार झेंडे पाटील यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार केली होती व मृताच्या वारसांना दहा लाख रुपये भरपाई देण्याची मागणी केली होती.
याची दखल घेत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने राज्याच्या मुख्य सचिवांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यावरून त्याचा तपास सीआयडी कडे सोपवण्यात आला होता. सीआयडी ने केलेल्या चौकशीत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला व तत्कालीन पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण, सहायक निरीक्षक महावीर जाधव, फौजदार हेमराज खोब्रागडे व अरुण ओके यांना अटक करण्यात आली होती.
या प्रकरणात आता राजकुमार अभयकुमार यांच्या वारसांना साडेसात लाख रुपयांची भरपाई देण्यात आल्याचे स्पष्ट झाले असून, त्याचा अहवाल गृह विभागाने दिला आहे. 12 एप्रिल 2024 रोजी ही तक्रार बंद करण्यात आल्याचे झेंडे यांना कळविण्यात आले आहे.











