बारामती : महान्यूज लाईव्ह
महाविकास आघाडीच्या लोकसभेच्या साठीच्या जागा वाटपाचे सूत्र आता अंतिम टप्प्यात आले असून येथे सहा व सात मार्च रोजी मुंबईत या संदर्भातील बैठक आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीतील गोविंदबाग या निवासस्थानी अनौपचारिक चर्चेदरम्यान ही माहिती दिली.
लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भात सध्या विविध माध्यमांमध्ये महाविकास आघाडीचे जागावाटप झाल्याची माहिती येत आहे. मात्र या संदर्भात पवार यांनी यासंदर्भातील महत्त्वाची बैठक मुंबई येथे होणार असून, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या जागा वाटपाचे सूत्र ठरेल अशी माहिती दिली.
त्याचबरोबर महाविकास आघाडीमध्ये इतरही पक्षांना सामावून घेण्याचे प्रयत्न सुरू असून त्या संदर्भातही चर्चा सुरू असल्याची माहिती पवार यांनी दिली. एकूणच महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचे अंतिम सूत्र अद्याप ठरलेले नसल्याने, यासंदर्भात माध्यमांमध्ये येणारी चर्चा महत्त्वाची नसल्याचेही यातून सूचित होत आहे.











