वर्धा : महान्यूज लाईव्ह
युवा संघर्ष यात्रा आज (ता. ७) वर्धा येथे पोहोचेल. या यात्रेच्या पार्श्वभूमीवर उद्या वर्ध्यात कन्हैयाकुमार यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेचा मुक्काम आज सेवाग्राम येथे असणार आहे.
पुण्यातील तुळापूर येथून सुरू झालेली पुणे ते नागपूर ही युवा संघर्ष यात्रा तब्बल सातशे किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून काल वर्धा जिल्ह्यात प्रवेश करती झाली. या यात्रेला तब्बल दोन वेळा पावसाच्या संकटाचा सामना करावा लागला.
काल देखील भर पावसात ही यात्रा सुरू राहिली. आज संध्याकाळी वर्धा शहरातील छत्रपती शिवाजी चौक येथे ही यात्रा पोहोचणार असून, या ठिकाणी कन्हैयाकुमार यांची जाहीर सभा होणार आहे. येत्या 12 डिसेंबर रोजी या सभेचा यात्रेचा समारोप होणार आहे.
या निमित्ताने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे नेते या सभेला उपस्थित राहणार आहेत. या सभेच्या निमित्ताने महाविकास आघाडीचे शक्ती प्रदर्शन करण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे.











