तब्बल ४०० मल्लांचा सहभाग!
राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
दौंड : दौंड तालुक्यातील पाटस येथील श्री नागेश्वर महाराज यात्रेत पार पडलेल्या कुस्तीच्या आखाड्यात शेवटची कुस्ती महाराष्ट्र कुस्ती चॅम्पियन सागर बिराजदार विरुद्ध सांगलीचा महाराष्ट्र चॅम्पियन सुदेश ठाकूर यांच्यात झाली. प्रेक्षकांना खिळवून ठेवणाऱ्या या शेवटच्या कुस्तीने अवघ्या पंधरा मिनिटात सागर बिराजदार याने सुदेश ठाकूर याला चितपट करीत आखाड्याचा विजेता पदाचा मान पटकावला.
पाटसचे ग्रामदैवत श्री नागेश्वर महाराज यांची यात्रा रविवार व सोमवारी (दि. २६ व २७ ) विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी पार पडली. यात्रेचे मुख्य आकर्षण होते ते, मैदानी खेळ म्हणून ओळखला जाणारा कुस्त्यांचा आखाडा! यात्रेनिमित्त भरवण्यात आलेल्या या कुस्ती आखाड्यात राज्यातील तब्बल २०० कुस्त्या झाल्या.
या मैदानात ४०० मल्लांनी सहभाग घेऊन आपला रोमांचक व थरारक कुस्तीच्या डाव प्रतिडाव टाकत चितपट करून दाखवला. या आखाड्यात वजन गटावर कुस्त्या घेण्यात आल्या. या आखाड्यात प्रथमच नऊ मुलींनी आखाड्यात उतरत रोमांचक कुस्तीचा खेळ दाखवून प्रेषकांची मने जिंकली. या मुलींच्या कुस्त्याही लक्षणीय व प्रेक्षणिय ठरली.
मात्र आखाड्यातील महत्त्वाच्या व मानाच्या तीन कुस्त्यांनी मात्र आखाड्याचे मैदान गाजवले. शेवटची कुस्ती पुणे येथील गोकुळ वस्ताद तालीमचा पट्टा आणि महाराष्ट्र कुस्ती चॅम्पियन सागर बिराजदार विरुद्ध सांगलीचा पट्टा महाराष्ट्र कृस्ती चॅम्पियन सुदेश ठाकूर यांच्यात झाली. दोन महाराष्ट्र कुस्ती चॅम्पियन मधील या लढतीत सागर बिराजदार याने अवघ्या पंधरा मिनिटात सुदेश ठाकूरला चितपट करत पाटसच्या आखाड्यातील माती दाखवली. या कुस्तीसाठी ग्रामस्थांच्या वतीने १ लाख ५१ हजार रुपयांचे इनाम ठेवण्यात आले होते.
दुसरी कुस्ती आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलचा उपहिंदकेसरी तुषार डुबे विरुद्ध नगरचा सुदर्शन कोतकर यांच्यात झाली. तुषार डुबे याने कोतकर याला चितपट करत दुसऱ्या नंबरची कुस्ती पटकावण्याचा मान मिळवला. या दुसऱ्या कुस्तीसाठी ग्रामस्थांच्या वतीने १ लाख २१ हजार रुपयांचे इनाम ठेवण्यात आले होते.
तिसरी मानाची कुस्ती पुण्याच्या हनुमान आखाड्यातला मल्ल समीर शेख विरुद्ध सांगलीच्या हांडे पाटील तालमीचा पट्टा प्रदीप ठाकूर यांच्यात झाली. या कुस्तीत समीर शेख यांने प्रदीप ठाकूरला चितपट करत कुस्ती जिंकली. या कुस्तीसाठी ग्रामस्थांच्या वतीने १ लाख ११ हजार रुपयांचे इनाम ठेवण्यात आला होते.
तीन मानाच्या कुस्त्यांसह इतरही रोमांचक आणि थरारक कुस्तीच्या खेळाने राज्यभरातून कृस्ती पाहण्यासाठी आलेल्या कुस्ती शौकीनांना खिळवून ठेवले. या आखाड्यात २०० कुस्त्या झाल्या. लहान मल्लांनी ही लक्षणीय अशी कुस्तीचे डाव प्रतीडाव टाकत कुस्त्यांचा रोमांचक खेळ दाखवला. या आखाड्यात पंच म्हणून अरुण भागवत, सोपान मोहिते, बंडू राखे, राजेंद्र मोहिते धनंजय भागवत, बापू भंडलकर गणेश शितोळे नितीन शितोळे, सोमनाथ शितोळे, संतोष भागवत आदींनी काम पाहिले.
कुस्ती निवेदक म्हणून प्रशांत भागवत व सागर चौधरी यांनी निवेदक करुन आखाड्यातील मल्लांचे मनोबल व उत्साह वाढवला. कुस्ती प्रेमींच्या डोळ्याचे पारणे फिटेल असा रोमांचक आणि थरारक कुस्त्यांचा मैदानी खेळ या आखाड्यात पाहायला मिळाला.











