दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील पाटस येथील ग्रामदैवत श्री नागेश्वर महाराज व वरवंड येथील ग्रामदैवत श्री गोपीनाथ महाराज यांची यात्रा उत्सव येत्या रविवारी दि २६ व २७ नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे.
यात्रेसाठी येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी पाटस व वरवंडकर सज्ज झाले असून यात्रेनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती यात्रा उत्सव कमिटीच्या वतीने देण्यात आली.
पाटसचे ग्रामदैवत श्री नागेश्वर महाराज मंदिरात रविवारी पहाटे काकड आरती तसेच सकाळी नऊ वाजता श्री नागेश्वर देवास लघु रुद्राभिषेक कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी पाच ते नऊ वाजता देवाला दंडवत घालण्याचा कार्यक्रम तसेच रात्री साडेनऊ वाजता लेझीम व झांजपथकाच्या गजरात शोभेची दारू व फटाक्यांच्या आतिषबाजीत देवाचा छबिना मिरवणूक होणार आहे.
दुसऱ्या दिवशी सोमवारी सकाळी दहा व रात्री नऊ वाजता हरिभाऊ बडेसह शिवकन्या बडे नगरकर यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम होणार आहे. तसेच पाटसच्या यात्रेचे मुख्य आकर्षण असलेला कुस्तींचा जंगी आकडा यंदाही नामांकित मल्लांच्या कुस्त्यांनी गाजणार आहे. तीन मानाच्या कुस्त्यांसाठी ग्रामस्थांच्या वतीने आकर्षक बक्षीस ठेवण्यात आले आहे.
या आखाड्यातील शेवटची कुस्तीही सागर बिराजदार व सुदेश ठाकूर यांच्यात होणार आहे. या कुस्तीसाठी ग्रामस्थांच्या वतीने १ लाख ५१ हजार रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. तर तुषार डुबे विरुद्ध सुदर्शन कोतकर यांच्यात होणार असून या कुस्तीसाठी १ लाख २१ हजार रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. समीर शेख विरुद्ध प्रदिप ठाकुर यांच्यातही कुस्ती होणार असुन या कुस्तीसाठी १लाख ११ हजार रुपयांचा इनाम ठेवण्यात आला आहे.
या तीन मानाच्या कुस्त्यांसह सहा कुस्त्या या नामांकित मल्लांच्यात होणार असुन ५१ हजार रुपये पर्यंत इनाम ठेवण्यात आले आहे. तसेच राज्यातील विविध नामांकित मल्ल्यांचा कुस्त्यांचा जंगी सामना या यात्रेनिमित्त कुस्तीशौकीनांना पाहता येणार आहे. यात्रेनिमित्त श्री. नागेश्वर मंदिराला आकर्षित विद्युत रोषणाई सजावट करण्यात आली आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक ते नागेश्वर मंदिर पर्यंत विद्युत रोषणाई करण्यात आली आहे, तसेच वरवंड येथील ग्रामदैवत श्री गोपीनाथ महाराज यांच्या यात्रेनिमित्त ग्रामस्थांच्या वतीने या दोन दिवस विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.











