हिंगोली : महान्यूज लाईव्ह
विदर्भ मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना आतापासूनच दुष्काळाचे तीव्र चटके बसू लागले आहेत. हे चटके एवढ्या मर्यादेपर्यंत पोहोचले आहेत की, आता कोणताच उपाय उरला नाही. त्यामुळे आता आमची लिव्हर आणि किडनी विकत घेता का? असा सवाल गावातील शेतकरी विचारू लागले आहेत. यासाठीचा दर देखील शेतकऱ्यांनी जाहीर केला आहे.
सेनगावच्या तहसीलदारांना हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी असाच प्रश्न विचारला असून, आमचे लिव्हर, किडनी द्यायचे आहे, कर्ज फेडले जात नाही, तुम्ही ते विकत घेता का? असा सवाल करणारे निवेदन या गावकऱ्यांनी दिले आहे. दुष्काळाचे दाहक चटके विदर्भ, मराठवाड्यात किती भीषण परिस्थितीत आत्ताच पोहोचले आहेत, याची चुणूक दाखवणारे हे निवेदन असून शेतकऱ्यांची गंभीर परिस्थितीकडे सर्वांचे लक्ष वेधले जावे यासाठी शेतकऱ्यांनी या गंभीर परिस्थितीशी चाहूल दाखवली आहे.
हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील सेनगाव आणि गोरेगाव मंडल विभागातील शेतकऱ्यांनी अशा प्रकारची निवेदने दिली आहेत. या शेतकऱ्यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यातही या संदर्भातील निवेदन दिले असून, कर्जाची परतफेड होत नसल्याने आमची डोळे, लिव्हर, किडनी विकत घ्यावे आणि आमचे कर्ज फेडावे अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे. यासाठी किडनी डोळे लिव्हर यांचे दर देखील जाहीर केले असून किती जण हे विकणार आहेत त्यांचे देखील माहिती या निवेदनात दिली आहे.
ही वेळ अशामुळे आली की, खरिपाच्या पेरण्या केल्या आणि पावसाने ओढ दिली. त्यामुळे खरीप हातचा गेला आणि त्यानंतर पावसाचा थांगपत्ताच लागला नाही. त्यामुळे एकीकडे पिके वाढली नाहीत आणि दुसरीकडे बोंडआळी, लाल्या अशा रोगांचा प्रादुर्भाव ही वाढला. त्यामुळे सगळ्याच गोष्टी हाताबाहेर गेल्याने शेतकरी निराश झाले आहेत.
अर्थात याकडे शासन किती गांभीर्याने पाहते हे महत्त्वाचे आहे. शासनाने राज्यातील 40 तालुक्यांमध्ये अगोदर दुष्काळ जाहीर केला, त्या तालुक्यांना जी मदत जाहीर केली, ती मदत त्यानंतरच्या जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांना लागू नाही. त्यामुळेच हे दुष्काळाचे चटके आणखी तीव्र होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांची निवेदन प्रत्यक्षापर्यंत पोहोचते काय अशी शक्यता ही निर्माण झाली आहे.











