डॉ. श्रीमंत कोकाटे, इतिहास अभ्यासक.
मी पीएच.डी. लवकरात लवकर पूर्ण करावी, यासाठी माझे अनेक हितचिंतक, मार्गदर्शक सतत पाठपुरावा करत होते, त्यापैकी प्रतापराव बोर्डे साहेब हे एक माझे मार्गदर्शक आहेत. ते अभ्यासू, प्रामाणिक आणि अत्यंत निरपेक्ष भावनेने काम करणारे, अनेक व्यक्ती आणि संघटनांचे मार्गदर्शक आहेत.
अत्यंत सज्जन गृहस्थ म्हणून त्यांची सर्वदूर ख्याती आहे. ते सेवानिवृत्त उच्च पदस्थ अधिकारी आहेत. ते उत्तम लेखक आहेत. त्यांना नवीन आलेले प्रत्येक पुस्तक भेट दिले की, ते आग्रहाने त्याची किंमत देतात, ते म्हणतात की किंमत किती आहे हे महत्त्वाचे नाही, तर पुस्तक फुकट घेणे हा पुस्तकाचा अपमान असतो, तर त्याचा मोबदला देणे हा लेखकाच्या कष्टाचा सन्मान असतो.
मी पीएच.डी. झाल्यानंतर त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी त्यांच्या घरी गेलो, तेंव्हा ते म्हणाले, श्रीमंत.. मी तुमचे टीव्हीवरील चर्चेतील युक्तीवाद पाहिले आहेत, त्यामुळे तुम्ही आता एलएलबी करा. मी होकार दिला, पण मी कांहीं गांभीर्याने घेतले नव्हते. कांहीं दिवसांनीं बोर्डे साहेबांनी फोन करून “एलएलबी प्रवेशाचे काय झाले, त्याची प्रवेश परीक्षा असते. त्याचा अभ्यास करून यावर्षी प्रवेश घ्या आणि प्रवेश घेतल्याचा मला फोन करा”
बोर्डे साहेबांचे नैतिक वजन इतके मोठे आहे की, अनेक मोठे नेते त्यांचा शब्द मोडत नाहीत, मी तर एक सामान्य व्यक्ती! बोर्डे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे प्रवेश परीक्षेचे पुस्तक आणले, अभ्यास केला. मी प्रवेश परीक्षा दिली. त्यामध्ये उत्तीर्ण झालो. मला घरापासून जवळ असणारे दर्जेदार लॉ कॉलेज पाहिजे होते.
ऐतिहासिक वारसा असणारे श्री. शिवाजी मराठा सोसायटीच्या लॉ कॉलेजला प्रवेशासाठी शेवटच्या दिवशी मी बाळासाहेब जेधे सरांना फोन केला. सरांनी संस्थेतील पदाधिकारी जगदीश जेधे काकांना बोलून लगेच मला कॉल करून सांगितले, एकच जागा शिल्लक आहे आणि लवकर प्रवेश घ्या!. मी तत्काळ कॉलेजमध्ये गेलो. प्राचार्य डॉ. विश्वनाथ पाटील सरांना भेटलो. त्यांनी लगेच प्रवेश दिला. बाळासाहेब जेधे सरांमुळे माझे एडमिशन झाले.
प्राचार्य डॉ. विश्वनाथ पाटील हे नामवंत कायदेतज्ज्ञ आहेत. ते प्रचंड व्यासंगी आहेत. केस लॉ, कायदा यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. ते उत्तम प्रशासक आहेत. अनेक विषय ते लीलया आणि हसत खेळत शिकवतात. महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद निष्णांत आहे. प्रत्येक उपक्रम करून घेतला जातो. एखादा व्हीआयपी विद्यार्थी आहे, म्हणून त्याला विशेष सवलत दिली जात नाही. गणवेशाबाबत अत्यंत काटेकोर नियम आहेत. अंतर्गत परीक्षा, असायंमेंट, व्हायवा याबाबत अत्यंत कडक शिस्तबद्धपणा आहे. याचा मला खूप अभिमान वाटला.
या महाविद्यालयात सर्वात महत्त्वाचे काय शिकायला मिळाले? तर सर्वोच्च, उच्च आणि सत्र न्यायालयाचे अनेक नामवंत न्यायाधीशांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन ऐकायला मिळाले. त्यामध्ये न्या. अभय ओक, न्या. रेवती मोहिते- डेरे, न्या. देशमुख, न्या. पोंक्षे इत्यादी. तसेच नामवंत वकील ऍड. उज्वल निकम, ऍड. उज्वला पवार, ऍड. मडके इत्यादी. तसेच जिल्हा न्यायालयात अनेक वेळा व्हीजीट दिली.
येरवडा कारागृह, बालसुधारगृह, यांना प्रत्यक्ष भेटी दिल्या. सर्वोच्च, उच्च न्यायालयाला भेट दिली. या महाविद्यालयात अत्यंत तळमळीने शिकविणाऱ्या प्रा. सिद्धकला भावसार, प्रा. आनंद बोकफोडे, प्रा. आलिया मुनशी, प्रा. अंजली गवळी, प्रा. टाक सर, दिवंगत प्रा. मकवाणा सर, अशी प्राध्यापकांची फौज आहे.
सर्व प्राध्यापक लॉ मधील कोणतीही कठीण संकल्पना समजावून सांगण्यासाठी तत्पर असतात. कार्यालयीन कामकाज पाहणाऱ्या सौ. मनीषा बोराडे, नारायण चांदणे विद्यार्थ्यांना खूप सहकार्य करतात. कॉलेजचे ग्रंथालय सुसज्ज असून ग्रंथपाल डॉ. दिपाली मॅडम अत्यंत सहकार्य करणाऱ्या विशेषतः कोणत्या विद्यार्थ्याला कोणते पुस्तक द्यायला पाहिजे, यामध्ये त्यांचा हातखंडा आहे.
संस्थेचे सेक्रेटरी अण्णा थोरात व सर्व संचालक हे प्रत्येक उपक्रमाला सढळ हाताने मदत करतात. विद्यार्थी, प्राचार्य आणि प्राध्यापक यांच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे असतात. संस्थेला खूप मोठा वारसा आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रेरणेने स्थापन झालेली ही संस्था आहे. विद्यमान शाहू महाराज हे संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. केशवराव जेधे, बाबुराव जेधे, जगताप गुरुजी इत्यादींच्या त्यागातून उभी राहिलेली ही संस्था आहे. या संस्थेचा विद्यार्थी असल्याचा मला खूप खूप अभिमान वाटतो.
एलएलबीचा निकाल लागल्यानंतर मी बोर्डे साहेबांना आनंदाची बातमी सांगितली, त्यावेळेस बोर्डे साहेब म्हणाले “खूप छान, अभिनंदन! पण आता तुम्हाला अस्खलित इंग्रजी बोलता आले पाहिजे. तुमच्याकडे ज्ञान खूप आहे, पण तुम्ही देश विदेशात इंग्रजीतून बोलला नाहीत, तर सर्व वाया जाईल, तुम्ही पहिला उत्तम इंग्लिश स्पीकिंग कोर्स जॉईन करा आणि नंतरच मला फोन करा” आता बोर्डे साहेबांनी मला नवीन टास्क दिला आहे. मी तो नक्की पूर्ण करेन. पण प्रत्येकाच्या जीवनात योग्य दिशा देणारे, योग्य मार्ग दाखविणारे, सतत प्रेरणा देणारे बोर्डे साहेब असावेत, असे मला मनापासून वाटते.











