बारामती : महान्यूज लाईव्ह
घरगुती कारणावरून झालेल्या बाचाबाचीचे रूपांतर बाप लेकाच्या भांडणात झाले आणि चक्क बापाने गज घेऊन मुलाच्या डोक्यात घातला. या घटनेत मुलाचा मृत्यू झाला. बारामती तालुक्यातील धुमाळवाडी परिसरात वडिलांनी मुलाचा खून केल्याची घटना घडली. ही घटना काल सोमवारी रात्री घडली, आज उघडकीस आली.
या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार धुमाळवाडी परिसरातील अहिल्यानगर येथे लालासाहेब धोंडीबा कोकरे व त्यांचा मुलगा गणेश दादासाहेब कोकरे हे राहतात. सोमवारी रात्री घरगुती कारणावरून त्यांच्यात बाचाबाची झाली. बाचाबाचीचे रूपांतर भांडणात झाले.
या भांडणात लालासाहेब कोकरे यांनी घरात ठेवलेला गज घेतला आणि मुलगा गणेश याच्या डोक्यात घातला. यात वर्मी घाव लागल्याने गणेशचा मृत्यू झाला. घटना सोमवारी रात्री घडली मात्र ती आज (मंगळवारी) सकाळी ही घटना उघडकीस आली.
दरम्यान घटनास्थळी माळेगाव पोलिसांनी भेट दिली असून, पोलीस निरीक्षक किरण अवचर पुढील तपास करत आहेत.











