शिरूर : महान्यूज लाईव्ह
दिवाळी हा दिव्यांचा सण…प्रकाशाचा उत्सवच ..परंतु लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आमावस्येला स्मशानभूमीत थांबलं तर…? शिरूर तालुक्यात एका गावात नागरिकांनी कुठलीही भीती अन् शंका न बाळगता मोठ्या उत्साहात ५०० दिवे प्रज्वलित करून अनोखा दीपोत्सव साजरा केलाच, शिवाय गप्पा अन् गाण्यांची मैफलही चांगलीच रंगवली…!
शिरसगाव काटा (ता.शिरूर) येथील श्री कोल्हाटी बुवा ग्रामविकास प्रतिष्ठानच्या वतीने यंदाचा दीपोत्सव स्मशानभूमीत अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. सुमारे ५०० दिवे प्रज्वलित करण्यात आले.तसेच या वेळी गप्पांची अन् गाण्यांची मैफल काही काळ चांगलीच रंगली. यावेळी केलेल्या फटाक्यांच्या आतषबाजीने अन् लावलेल्या दिव्यांनी सारा स्मशानभूमी परिसर उजळून निघाला.
यावेळी बोलताना श्री कोल्हाटी बुवा ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल कदम म्हणाले की, अमावास्येला स्मशानात जायचं नसतं. याबाबत समाजात मोठ्या प्रमाणावर अंधश्रद्धा आहेत. या उलट आम्ही हा सण दिवे लावून समाजातील अनिष्ठ रूढी परंपरांना फाटा देऊन भीती दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत.
यावेळी श्री कोल्हाटी बुवा ग्रामविकास प्रतिष्ठानचे सचिव जयदीप पवार, प्रा. सचिन आवारे, गणेश शिंदे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोपाल काटे, भरत काटे, निलेश शिंदे, नानासाहेब बोरकर आदी उपस्थित होते.











